आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर कॉलेजचा छात्र सलग दुसर्‍या वर्षीही ‘बेस्ट कॅडेट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात झालेल्या ‘बेस्ट कॅडेट’ स्पर्धेत अहमदनगर महाविद्यालयाचा छात्र प्रेम कोळपकर याने सुवर्णपदक पटकावले. प्रेमच्या कामगिरीमुळे महाराष्ट्र संचालनालयाला सलग सहाव्यांदा ‘पंतप्रधान बॅनर’ मिळाला. राष्ट्रीय छात्रसेनेच्या वरिष्ठ विभागात ‘ऑल इंडिया बेस्ट कॅडेट’चा बहुमान मिळवून प्रेमने नगर जिल्हा व महाविद्यालयासाठी सुवर्णाक्षरांत इतिहास रचला.

संपूर्ण भारतात सलग दुसर्‍या वर्षी या स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेले अहमदनगर महाविद्यालय हे एकमात्र महाविद्यालय ठरले आहे. एनसीसीच्या पंतप्रधान रॅलीमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्याला सुवर्णपदक व चषक प्रदान करण्यात आला. याच सोहळ्यात मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ महाराष्ट्राला मिळाला. अहमदनगर महाविद्यालयाची कॅडेट शिवानी पारेख हिने पंतप्रधान यांच्या हस्ते तो स्वीकारला.

यावेळी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी, संरक्षण दलाचे तिन्ही प्रमुख, एनसीसीचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल अनिरुद्ध चक्रवर्ती उपस्थित होते. महाराष्ट्राचा कॅडेट प्रेम कोळपकर याने शिबिरातील सर्व कसोट्या यशस्वीपणे पार करत सुवर्णपदकावर नाव कोरले. बटालियनचे कमान अधिकारी कर्नल के. एस. मारव्हा, कर्नल आर. एस. खत्री व नगर महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमुख मेजर डॉ. श्याम खरात यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.

डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेचे सचिव फिलिप बार्नबस, प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस, महाराष्ट्र संचालनालयाचे उपमहानिदेशक ब्रिगेडियर आर. एस. ग्रेवाल, औरंगाबाद विभागाचे ग्रूप कमांडर ब्रिगेडियर एस. यु. दशरथ यांनी प्रेमचे अभिनंदन केले.