आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 टीएमसी पाण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव - कोपरगावसह राहाता, सिन्नर व निफाड या तालुक्यांचे हक्काचे 11 टीएमसी पाणी पूर्ववत द्यावे, या मागणीसाठी सोमवारी कोपरगाव येथे नगर-मनमाड रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने गोदावरी डावा व उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ बरखास्त करून नवीन उध्र्व गोदावरी खोरे महामंडळ स्थापन करावे; अन्यथा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

गोदावरी कालव्यातून हक्काचे 11 टीएमसी पाणी द्यावे, औरंगाबादचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ बरखास्त करावे, उध्र्व गोदावरी खोर्‍यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे यासह अन्य मागण्यासांठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार अशोक काळे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे व बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

शंकरराव कोल्हे म्हणाले, राज्य सरकारने कबूल केल्याप्रमाणे एकही मागणी पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर आता माझा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मी जेलभरो आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. खासदार वाकचौरे म्हणाले, एकेकाळी राज्यावर हुकूमत असलेल्या नगर जिल्ह्याची अवस्था दयनीय झाली आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, महाराष्ट्रातील अधिकारी योजनांच्या फायली दिल्लीला पाठवत नाहीत. कोपरगावच्या पाणीप्रश्नाबाबत जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी लक्ष घालावे.

आमदार काळे म्हणाले, विकासाच्या नावाखाली सरकार सिंचनाच्या पाण्याची लूट करत आहे. सरकारने पाण्याबाबत इंडिया बुल्स कंपनीशी केलेला करार रद्द करावा. पाणीप्रश्न आता गंभीर झाला आहे. सरकार आवर्तन देण्याचे कबूल करूनही देत नाही. मराठवाड्याचे सर्व मंत्री व लोकप्रतिनिधी एकत्र आल्यामुळे सरकार नमले, असेही त्यांनी सांगितले.


जेलमध्ये जाण्याची माझी तयारी
सरकार आपले असले, तरी जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडवणार नसेल, तर अशा सरकार चालवणार्‍या पक्षाबरोबर आपण राहणार नाही. आमचे सरकार शेतीच्या पाण्यावर डल्ला मारून ते कंपन्यांना विकते आहे. सरकार शेतकरीधाजिर्णे नाही. शेती उद्ध्वस्त करण्याचे धोरण त्यांनी हाती घेतले आहे. पाण्यासाठी तीन महिने जेलमध्ये राहण्यास मी तयार आहे. शंकरराव कोल्हे, माजी मंत्री.