आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ मिळाल्याने पाण्याचे सर्व टँकर बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दुष्काळी उपाययोजनांची मुदत ३० जूनला संपल्याने जिल्ह्यात सुरू असलेले ३३९ टँकर बुधवारपासून बंद झाले अाहेत. त्यामुळे टँकरवर अवलंबून असलेल्या लाख ६४ हजार ५१५ नागरिकांना पाण्यासाठी पुन्हा भटकंती करावी लागणार आहे.

नगर जल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९७ मिलिमीटर आहे. गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात जानेवारीपासूनच टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. जानेवारीत २० टँकर सुरू होते. फेब्रुवारीत ही संख्या ९० वर गेली. मार्च अखेरपर्यंत जिल्ह्यात तब्बल १७७ टँकर सुरू होते. एप्रिलमध्ये टँकरची संख्या २५० झाली.

जिल्ह्यात सर्वाधिक टंचाईस्थिती पाथर्डी, पारनेर, जामखेड, शेवगाव नगर या तालुक्यात निर्माण झाली आहे. मे महिन्याअखेर तेथील टँकरची संख्या ३९० वर गेली. यंदा जूनपासून पावसाला सुरुवात झाली. १५ जूनपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी झाला. १५ जूनअखेर अकोले ७६, संगमनेर १४, कोपरगाव २८, श्रीरामपूर २७, राहुरी ३९, नेवासे ५५, नगर १०७, शेवगाव ६८, पाथर्डी ३२, पारनेर ५२, कर्जत ५२ श्रीगोंदे येथे ४६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या २५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली असतानाच शासनाने दिलेल्या दुष्काळी उपाययोजनांची मुदत ३० जून रोजी संपल्याने ऐन टंचाईत प्रशासनाला जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करावे लागले आहेत. जिल्ह्यात तब्बल २५४ गावे हजार १३७ वाड्या-वस्त्यांना ३३९ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. त्यात ३२० खासगी, तर १९ शासकीय टँकर होते. उपाययोजनांची मुदत संपल्याने २५४ गावांमधील लाख ६४ हजार ५१५ नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

टँकर संख्या
-संगमनेर२६
-नेवासे ०८
-कोपरगाव ०१
-नगर ३८
-पाथर्डी ७६
-पारनेर ६६
-शेवगाव ३८
-कर्जत ४४
-जामखेड २६
-श्रीगोंदे १४

प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे
पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने टंचाई स्थिती आणखी वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुष्काळी उपाययोजनांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्याकडे पाठवला आहे. त्यावर अजून निर्णय झालेला नाही.