आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती आणि आघाडीच्या घोळात इच्छुक ‘गॅस’वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, पण प्रदेशपातळीवर युती, आघाडीसाठी जोरदार हालचाली सुरू असल्याने इच्छुक ‘गॅस’वर आहेत. सध्यातरी जिल्हास्तरावरील पक्षनेत्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू ठेवली आहे.
 
जिल्हा परिषदेचे ७३ गट पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, तसेच काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर झालेल्या बैठकांत कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. बहुजन क्रांती मोर्चाने जागा लढवण्याचे संकेत दिले आहेत.
 
जामखेडमधील जवळा गण अनुसूचित जातीसाठी राखीव असला, तरी सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. 
 
मागील पंचवार्षिक (२०१२) निवडणुका स्वबळावरच झाल्या होत्या. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे होते. सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने सत्ता स्थापन करताना अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळाले. सध्या उपाध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. पण आगामी निवडणूक अनेक कारणांनी वेगळी आहे.
 
 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपचे राम शिंदे यांच्याकडे आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात भाजप आमदारांची संख्याही तुलनेने जास्त असून एक खासदारपदही आहे. त्याखालोखाल काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार अाहेत. शिवसेनेकडे एक आमदार एक खासदार आहे. जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त गट ताब्यात ठेवून आगामी विधानसभेची गणिते आखण्यासाठी आमदारांकडून प्रयत्न होणार आहेत. 
 
जिल्हा परिषदेत विद्यमान सत्ताधारी जरी काँग्रेस राष्ट्रवादीचे असले, तरी पुन्हा सत्ता खेचून गड राखण्याचे आव्हान दोन्ही काँग्रेससमोर आहे. यंदाही निवडणुका स्वबळावर लढवण्याचा अट्टहास कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. परंतु प्रदेश पातळीवर भाजप शिवसेना युती, तसेच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सध्या अस्वस्थता आहे. 
 
कार्यकर्ते अजूनही स्वबळावरच ठाम आहेत. प्रदेशपातळीवर संक्रांतीनंतर युती, आघाडीचा निर्णय होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज देऊन मुलाखती दिल्या अाहेत. युती-आघाडी झाली, तर जागावाटपात अडचण होईल, म्हणून सध्यातरी इच्छौक उमेदवार चिंताग्रस्त आहेत. 

बंडखोरीची मोठी धास्ती 
मागीलवेळी स्थानिक पातळीवर पुढील निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द देऊन अनेक उमेदवारांना थांबवण्यात आले होते. परंतु यंदा युती, आघाडी झाली, तर जागावाटपात अनेकांचा पत्ता कट होणार आहे. अशा परिस्थितीत बंडखोरीचा फटका बसण्याची धास्ती सर्वच राजकीय पक्षांना आहे. निष्ठावानांना विश्वासात घेऊन उमेदवारी देण्याचे आव्हान सर्वच पक्षांसमोर आहे. 
उत्तर-दक्षिणेत परस्पर विरोधी आघाड्या ? 

जिल्ह्याच्या दक्षिण भागात शिवसेना भाजपशी हातमिळवणी करायला सध्या तरी तयार नाही. त्यामुळे युती झालीच, तर उत्तरेतील काही तालुक्यांत होऊ शकते. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी नगर दक्षिण जिल्ह्यातील काही तालुक्यांत होऊ शकते. उत्तरेत काही भागात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.