आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरघोड्यांनी उडवली नेत्यांची झोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी उमेदवारी नाकारणार्‍या नेत्यांनी अचानक उतावीळ होऊन उमेदवारीसाठी मुंबई व दिल्लीचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे. इतरांच्या तुलनेत आपण कसे सरस आहोत, हे दाखवण्याच्या नादात पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. हा कलह सामोपचाराने न सोडवल्यास त्याचा फटका निवडणुकीत बसण्याच्या भीतीने र्शेष्ठींनी उमेदवारी पक्की समजून तयारीला लागलेल्यांना त्यांनी ‘गॅस’वर ठेवले आहे.
राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठय़ा असलेल्या नगर जिल्ह्यात शिर्डी व नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार शिवाजी कर्डिले यांनी नशीब आजमावले होते, तर माजी आमदार राजीव राजळे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. भाजपचे दिलीप गांधी विजयी होऊन राजळे व कर्डिले यांना त्या वेळी पराभव पत्करावा लागला. नंतर कर्डिले यांनी भाजपची वाट धरून राहुरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.
सध्या नगर मतदारसंघातून भाजपचे दिलीप गांधी, तर शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब वाकचौरे विद्यमान खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होणार असल्याने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. जिल्ह्याचे दोन्ही खासदार युतीचे असताना काँग्रेस व राष्ट्रवादीने दोन्ही जागा जिंकण्याचा चंग बांधला आहे. नगरची जागा राष्ट्रवादीला, तर शिर्डीची जागा काँग्रेसला अशी सरळ वाटणी आहे. मागील निवडणुकीत बंडखोरी करणारे राजळे या वेळी राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. जिल्ह्यातील नात्यागोत्याचे राजकारण पाहता त्यांना संधी मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी उमेदवारीला नकार देत राजळेंना पाठिंबा दिला आहे. पण पक्षांतर्गत दोन मतप्रवाह असल्याने नगर, र्शीगोंदे, पारनेर तालुक्यांतील काही नेत्यांचा राजळेंना विरोध आहे. नगरच्या जागेसाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी आपले चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांच्या नावाचा आग्रह धरला होता, पण ही घराणेशाही पक्षातील काही जणांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे राजळेंनाच संधी मिळणार या चर्चेने जोर धरला.
दरम्यान, पाचपुते यांना पक्षर्शेष्ठींनी मतदारसंघाचा दौरा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ते कामाला लागले असून जिल्हा परिषदेचा गटनिहाय दौरा करत आहेत. पक्षाने संधी दिली, तर पाचपुतेही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. पण उमेदवारीबाबत निर्णय घेण्यास त्यांना उशीर झाला आहे. माजी आमदार दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांची नावे शर्यतीतून केव्हाच गायब झाली आहेत. भाजपकडून खासदार गांधी, आमदार राम शिंदे व जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या नावांची चर्चा आहे. आघाडीप्रमाणे युतीमध्येदेखील अंतर्गत मतभेद असल्याने वाद मिटवण्याचे आव्हान पक्षर्शेष्ठींसमोर आहे. खासदार गांधी यांच्यावर नगर अर्बन बँकेतील कारभाराबाबत अनेकदा ताशेरे ओढण्यात आले. त्यांच्या विरोधकांनी याच मुद्दय़ांचे भांडवल करून गांधी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबरच पक्षातील इतर पुढार्‍यांनीही गांधींच्या अलिप्ततेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, गांधी सलग दोनदा खासदार असल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण नात्यागोत्याच्या राजकारणात गांधींना डावलले जाऊ शकते.
शिर्डीत वाकचौरे यांची भूमिका महत्त्वाची
शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे पारडे सध्या जड आहे. त्यामुळेच काँग्रेसमधून त्यांना उमेदवारीची गळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँगेसच्या या प्रयत्नांमुळे वाकचौरे यांची अडचण झाली आहे. काँग्रेसकडे जावे तर ‘मोदी लाटे’चा फटका बसण्याची शक्यता, तसेच राहुल गांधी यांनी निश्चित केलेल्या ‘निष्ठावंत’ या निकषाची अडचण. या मतदारसंघातील तीन आमदार राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद भूषवत आहेत. मागच्या निवडणुकीत रिपाइंचे रामदास आठवले यांचा दारुण पराभव झाला.
पक्षाचे चिन्ह नसल्याने पराभवाचे खापर परस्परांवर फोडण्यात या मंत्र्यांना यश आले. मात्र, या निवडणुकीत उमेदवार पक्षचिन्हावर निवडणूक लढवणार असल्याने त्याला निवडून आणण्याची जबाबदारी या तिन्ही मंत्र्यांवर आहे; अन्यथा त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असेल. वाकचौरे यांची डळमळीत भूमिका लक्षात घेऊन र्शीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्याबाबतही चाचपणी करण्यात आली. मात्र, ते उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत आहे. लहू कानडे, प्रेमानंद रुपवते या पर्यायांवरही विचार सुरू आहे. वाकचौरे काँग्रेसमध्ये गेले, तर शिवसेनेला सक्षम उमेदवारासाठी चांगलीच धावाधाव करावी लागेल.
भाजपचे स्थानिक सर्वेक्षण
भाजप उमेदवारांच्या बुधवारी पुण्यात मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्यासह माजी आमदार संभाजी निलंगेकर व डॉ. राजेंद्र फडके उपस्थित होते. खासदार गांधी, आमदार शिंदे व जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी मुलाखती दिल्या. उमेदवारी निश्चितीपूर्वी स्थानिक पातळीवर सव्र्हे करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले असल्याची माहिती भाजपचे शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
ऐनवेळी बाहेरचा उमेदवार
खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या भूमिकेवर काँग्रेसची गणिते अवलंबून आहेत. ऐनवेळी बाहेरचा उमेदवार देण्याचा पर्यायही काँग्रेस पक्षाने ठेवला आहे. त्यासाठी केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष भालचंद्र मुणगेकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती हे काँग्रेसचे ऐनवेळचे उमेदवार ठरू शकतात. याला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे.
मी निवडणुकीसाठी तयार
मी कधीही बंडखोरी केली नाही. मी सातत्याने जनतेबरोबरच असतो. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेला उभे राहावे लागेल, असे सांगितले होते. मला पक्षाने सांगितल्यास मी उभा राहीन. सध्या मी र्शीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्याच्या दौर्‍यावर आहे. जनतेला भेटून, त्यांच्याशी चर्चा करून वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार आहे. उमेदवार कोण असेल, हे लवकरच समोर येईल.’’ बबनराव पाचपुते, आमदार, राष्ट्रवादी.