आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरतिथीसाठी लाखावर भाविक येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अवतार मेहेरबाबा यांच्या 44 व्या अमरतिथी सोहळ्याला 30 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या वर्षी विविध 70 देशांतील, तसेच भारताच्या कानाकोपर्‍यातील सुमारे एक लाखावर भाविक या उत्सवाला उपस्थित राहतील, अशी माहिती मेहेरबाबा ट्रस्टचे विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी यांनी शुक्रवारी दिली.

नगरपासून सहा किलोमीटर अंतरावर अरणगावजवळ मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबांची समाधी आहे. मेहेरबाबांचे 31 जानेवारी 1969 रोजी पिंपळगाव माळवी येथे महानिर्वाण झाले. जगात मी कोठेही देह ठेवला, तरी मेहेराबाद येथे मला समाधिस्त करावे, असे मेहेरबाबांनी सांगून ठेवले होते. त्यांच्या इच्छेनुसार मेहेराबादला अंत्यविधी करण्यात आले. त्यांचा स्मृतिदिन अमरतिथी म्हणून 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी असे तीन दिवस साजरी केली जाते. मेहेरबाबांचे भक्त जगभर असून दरवर्षी त्यात वाढ होत आहे. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, इराण आदी देशांत मेहेरप्रेमींची संख्या मोठी आहे.

30 जानेवारीला बाबांची प्रार्थना व आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होईल. नंतर फिल्म शो व विविध ठिकाणांहून आलेले भक्त भजने सादर करतील. 31 जानेवारीला सकाळी 6 वाजता प्रार्थना होऊन 7 वाजता बाबांची धुनी पेटवली जाईल. सकाळी 11 वाजता व्याख्यान होईल. साडेअकरा वाजता मेहेरधून म्हटली जाईल. बाबांनी देहत्याग केला त्यावेळी म्हणजे दुपारी 12 वाजता 15 मिनिटे मौन पाळले जाईल. नंतर सर्व भाषांमधून आरती व प्रार्थना करण्यात येईल. रात्री 10 पर्यंत देश-विदेशांतील मेहेरप्रेमी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. यात नृत्य, नाटक व गझलांचा कार्यक्रम असेल. 1 फेब्रुवारीला भजने, आरती, प्रार्थना असे कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होईल.

रांगेतून दर्शन घेण्यासाठी भाविकांना क्रमांक देण्यात येणार असल्याने कोणतीही अडचण येणार नाही. मेहेराबाद येथे भव्य शामियाना उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.