आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये दुमदुमली भीमगर्जना, डीजेच्या तालावर थिरकले भीमसैनिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी शहर उपनगरांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चौकाचौकांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम, महापौर तथा आमदार संग्राम जगताप, महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त भालचंद्र बेहेरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत मार्केटयार्ड चौकातील आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
विविध जिल्ह्यांतून आलेल्या कलाकारांनी भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. सायंकाळी आंबेडकर पुतळ्यापासून बसस्थानक, माळीवाडा वेस, माणिकचौक, कापडबाजार या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नीलक्रांती मित्रमंडळासह दहा मंडळे सहभागी झाली होती. पोलिस प्रशासनातर्फे या मंडळांना केवळ वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु बहुतांश मंडळात डीजेचा समावेश होता. डीजेच्या तालावर भीमसैनिक थिरकत होते. ध्वनिमर्यादा ओलांडल्यास मंडळांविरुद्ध, तसेच मिरवणुकीत धिंगाणा घालणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. रामनवमीच्या दिवशी दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या मिरवणुकीत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला. सोमवारी सायंकाळी मिरवणूक मार्गावर संचलन करण्यात आले होते.

मिरवणूक मार्गासह शहरातील ठरावीक ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. मिरवणूक मार्गाला समांतर असलेल्या रस्त्यांवर पोलिसांची गस्त सुरु होती. सर्जेपुरा मंगलगेट भागात भरणारा मंगळवारचा आठवडे बाजार तात्पुरता बागडपट्टी परिसरात हलवण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त अधीक्षक शैलेश बलकवडे, शहर विभागाचे उपअधीक्षक यादवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा तैनात होता. राज्य राखीव पोलिस दलासह होमगार्डसही शहरातील बंदोबस्तात हाेते.

फोटो - आंबेडकर जयंतीनिमित्त नगरमध्ये मंगळवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.