आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AMC Street Light On Bar And Hotel In Ahemadnagar

PHOTOS: हॉटेल, दारू दुकानांवर मनपाचे 'दिवे', प्रभागातील महत्त्वाचे चौक मात्र अंधारात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वत:च्या प्रभागात खूप मोठे कल्याणकारी काम केल्याचा दावा करणारे काही नगरसेवक महापालिकेला ओरबडण्यात कसे आघाडीवर असतात, याचे ढळढळीत उदाहरण समोर आले आहे. नगरसेवक अनिल बोरुडे यांनी आपल्या हॉटेल दारूच्या दुकानासमोर चक्क मनपाचे दिवे लावले आहेत. बोरुडे यांनी जनतेला अंधारात ठेवून स्वत:चे हॉटेल दारूच्या दुकानासमोर फुकटात लख्ख प्रकाश कसा पडेल, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. हॉटेलसमोर लावण्यात आलेले सर्व दिवे महापालिकेचे असल्याचे मनपाच्या विद्यूत विभागाने सोमवारी स्पष्ट केले.
शासनाच्या नगरोत्थान योजनेंतर्गत शहराच्या विविध भागात कोट्यवधींची विद्यूतीकरणाची कामे करण्यात आली. ही कामे सुरू असताना अनेक नगरसेवकांना खिरापतीप्रमाणे दिव्यांचे वाटप करण्यात आले. आपल्या पदाचा गैरवापर करत काही नगरसेवकांनी मनपा ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून हवे तेथे हवे तितके दिवे बसवून घेतले. त्यात नगरसेवक बोरुडे यांचा क्रमांक वरचा आहे. त्यांनी पाइपलाइन रस्त्यावरील स्वत:चे हॉटेल दारूच्या दुकानावर असे "दिवे' लावले आहेत. याप्रकरणी "दिव्य मराठी'ने जाब विचारला असता, आम्ही स्व:खर्चाने हे दिवे बसवले असल्याचे त्यांनी सांिगतले. मात्र, "दिव्य मराठी'ने या दिव्यांचे फोटो काढून ते मनपाच्या विद्यूत विभागाला दाखवले असता हे खासगी नव्हे, तर मनपाचेच दिवे असल्याचे या विभागाने स्पष्ट केले.

अनेक लहान-मोठ्या वसाहती अशा अाहेत, की तेथे आजही एलईडी सोडा, साधा पथदिवाही नाही. जे आहेत ते सुरू नाहीत. चोरांपासून संरक्षण होण्यासाठी पथदिवे मिळावेत, यासाठी विविध भागांतील नागरिकांनी अनेकदा मनपाचे उंबरठे झिजवले, आंदोलनेही केली. परंतु त्यांना अजून पथदिवे मिळालेले नाहीत. असे असताना आपल्याला हवे तेथे (स्वत:च्या खासगी मालमत्तेवर) दिवे बसवून घेणारे बोरुडेंसारखे अनेक लोकप्रतिनिधी मनपात आहेत, ही जनतेची शोकांतिकाच आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी परिसरातील जागरूक नागरिकांनी केली आहे. शविाय या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध सामािजक संघटनाही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

महापालिकेच्या विद्युत विभागाने दिवे मनपाचेच असल्याची कबुली दिली असली, तरी हे दिवे त्यांच्याच परवानगीने बसवण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित मनपा कर्मचाऱ्यांची देखील चौकशी करावी, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत. पाइपलाइन रस्त्यासह शहराच्या विविध भागात अशाप्रकारे दिव्यांची खिरापत लुटण्यात आली आहे. याप्रकरणी मनपा प्रशासनाकडून काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संदीप वाईन शॉपीसमोरही मनपाचेच दिवे लावण्यात आले आहेत. (उजवीकडे) जवळच असलेल्या िभस्तबाग चौकात मात्र पुरेसे दिवे नसल्याने रात्री असा अंधार पसरतो.

दिवे मनपाचेच.....
"दिव्यमराठी'ने बोरुडे यांच्या हॉटेल दारूच्या दुकानासमोर लावलेल्या दिव्यांचे फोटो काढले. त्यानंतर दिव्यांबाबत बोरुडे यांच्याकडे विचारणा केली असता दिवे खासगी असल्याचे त्यांनी सांिगतले. शहानिशा करण्यासाठी "दिव्य मराठी'च्या प्रतिनिधींनी मनपाचे विद्यूत विभाग गाठले. तेथील कर्मचाऱ्यांना फोटो दाखवताच हे मनपाचेच दिवे असल्याचे स्पष्ट केले.
दिवा ३,५०० रुपयांचा
हॉटेलदारूच्या दुकानासमोर लावलेले बहुतेक दिवे बाय २४ एनर्जी फिटिंगचे आहेत. मनपाच्या डीएसआरनुसार एका दिव्याची किंमत साडेतीन हजार रुपये आहे. दिवे लावण्यासाठी लागणारे क्लॅम्प इतर साहित्याचा खर्च पकडून एका दिव्याची किंमत साडेपाच ते सहा हजार रुपये आहे. शहराच्या अनेक भागात असे दिवे बसवण्यात आले आहेत.
चौकात अंधारच...
बोरुडेयांच्या हॉटेल दारूच्या दुकानासमोर लख्ख प्रकाश असला, तरी अवघ्या काही अंतरावर असलेल्या भिस्तबाग चौकात मात्र अंधारच असतो. पथदिवे असले, तरी त्यांचा प्रकाश चौकासाठी पुरेसा नाही. चौकात रात्री उशिरापर्यंत मोठी वर्दळ असते. या ठिकाणी मोठे दिवे बसवण्याकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
चौकशी होणार...
विद्यूतीकरणाच्यासहा कामांपैकी पाइपलाइन रस्त्यावर ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पथदिव्यांच्या कामांची चौकशी होणार आहे. बांधकाम विभागाच्या गुणनियंत्रण दक्षता मंडळातर्फे ही चौकशी होणार आहे. त्यासाठी मनपाने सुमारे अडीच लाख रुपयांचे शुल्क या विभागाला दिले आहे. लवकरच कामाची चौकशी करण्यात येणार आहे.
कामात गैरव्यवहार
नगरोत्थानअभियानात शहरात सुमारे दहा कोटींची कामे करण्यात आली. त्यात साडेतीन कोटींच्या एलईडी दिव्यांच्या कामाचाही समावेश आहे. गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखा परीक्षण करण्यात आले, तरी तक्रारी कायम असल्याने गुणनियंत्रण दक्षता मंडळामार्फत चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मनपा भरते वीजबिल
ज्या ठिकाणी विजेचा खांब असेल, त्यावर पथदिवे बसवण्यात येतात. पाइपलाइन रस्त्यावरील बोरुडे यांच्या हॉटेलसमोरील विद्यूत पोलवर दिवे बसवण्यात आले आहेत. या सर्व दिव्यांचे वीजबिल महापालिकेतर्फेच भरण्यात येते.''
- बाळासाहेब सावळे, विद्यूत विभागप्रमुख, मनपा.
दिवे आमचेच....
"हॉटेलसमोर बसवलेले सर्व दिवे खासगी आहेत. महापालिकेचा त्याच्याशी संबंध नाही. आम्ही व्यवसाय करतो. त्यामुळे असे बोगस काम आम्ही कधीच करणार नाही. वाटले तर तुम्ही महापालिकेत विचारणा करा, दिवे आमचेच आहेत. शविाय ज्या भागात हॉटेल आहेत, तो भाग माझ्याच प्रभागात नाही. त्यामुळे मनपाचे दिवे लावण्याचा काही प्रश्नच येत नाही."
अनिल बोरुडे, नगरसेवक.
उपोषणाला बसणार
"पथदिव्यांच्या कामाची गुणनियंत्रण दक्षता मंडळामार्फत चौकशी करावी, अशी मागणी मनपाकडे केली. परंतु अधिकारी पदाधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करतात. लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे शहरात अनेक ठिकाणी खासगी मालमत्तांवर दिवे लावण्यात आले आहेत. त्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी मनपासमोर उपाेषण करणार आहे."
शाकीरशेख, सामाजिक कार्यकर्ते.

पाइपलाइन रस्त्यावरील हॉटेल पंचरत्नसमोर महापालिकेचे दिवे लावल्याने रात्री हॉटेलसमोर असा लख्ख प्रकाश असतो. छाया: कल्पक हतवळणे