आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरधाममधील बांधकाम थांबवा; अन्यथा काळे फासू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अमरधाम स्मशानभूमीची संरक्षक भिंत पाडून व्यापारी गाळे बांधण्याचा महापालिकेने घेतलेला निर्णय निंदनीय आहे. प्रशासनाने या गाळ्यांचे बांधकाम थांबवल्यास अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशारा भाजपचे महानगर अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी दिला.
गांधी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी शहर भाजप कार्यकारिणीची बैठक गांधी मैदानातील पक्षाच्या कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते. सरचिटणीस किशोर बोरा, श्रीकांत साठे, उपाध्यक्ष सुनील रामदासी, चिटणीस जगन्नाथ निंबाळकर, उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेते सुवेंद्र गांधी, गौतम दीक्षित, चेतन जग्गी, वसंत राठोड, नितीन शेलार, दामोदर माखिजा, तुषार पोटे, मल्हार गंधे, संग्राम म्हस्के, अन्वर खान, संगीता मुळे, लीला आगरवाल, वल्लभ कुसकर, सुनील पंडित यावेळी उपस्थित होते.

गांधी म्हणाले, अमरधामची जागा विकायला काढणे म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा प्रकार आहे. ज्या ठिकाणी हे बांधकाम होत आहे, ती लहान बालकांची स्मशानभूमी आहे. महापालिकेच्या तत्कालीन काँग्रेस-आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी गुपचूप महासभेच्या आयत्या वेळच्या विषयात याबाबतचा ठराव केला. या ठरावाची तातडीने चौकशी करुन तो रद्द करावा; अन्यथा भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरेल. तातडीने या व्यापारी गाळ्यांचे बांधकाम थांबवले नाही, तर महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशाराही त्यांनी दिला.
गांधी म्हणाले, बेकायदेशीररित्या अधिकाराचा दुरुपयोग करुन तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांनी काही लोकांना जागा देण्यासाठी हा निर्णय घेतला. आता नगर शहर झपाट्याने वाढत आहे. एकच अमरधाम नगरमध्ये आहे. त्यामुळे अमरधाममधील जागा कमी पडत असतांना काही लोकांना खूश करण्याकरिता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला. मात्र, भाजप कधीही हे काम होऊ देणार नाही. महापालिकेला भीक लागली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


बातम्या आणखी आहेत...