आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Democracy Healthy And Meaningfull Anna Hazare

कायद्याची कडक अंमलबजावणी करणारी अमेरिकेची लोकशाही सुदृढ व निकोप - अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राळेगणसिद्धी - ‘अमेरिकेतील लोकशाही, सार्वजनिक जीवनातील शिस्त, स्वच्छता, प्रामाणिकपणा यामुळे आपणही अतिशय प्रभावित झालो. तेथील सर्व व्यवस्था अतिशय चांगली आहे. कोठेही गोंधळ दिसला नाही. बारा दिवसांत एकदाही हॉर्नचा आवाज ऐकला नाही. त्यांची लोकशाही सुदृढ व निकोप आहे. कारण त्यांनी केलेल्या कायद्यांची तेथे कडक अंमलबजावणी होते. आपल्याकडे कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी करणारी व्यवस्था किडलेली आहे. आपली लोकशाही कमकुवत असल्याचे कारण म्हणजे आपल्याकडे सर्व योजना सरकार राबवते. त्यामुळे योजनांना पाझर फुटून एक रुपयांतील दहा पैसेही लाभार्थींपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्याकडे कायद्याची भीतीच राहिलेली नाही. त्यामुळे गैरव्यवहारांचे प्रमाण प्रचंड आहे. अमेरिकेत मात्र योजना खासगी संस्था व लोक राबवतात. लोकप्रतिनिधी फक्त अंमलबजावणीवर बारीक लक्ष ठेवतात. कामाच्या दर्जासाठी तेथे कडक कायदे व कठोर शिक्षा आहेत. त्यामुळे तेथे गैरव्यवहारांचे प्रमाण कमी आहे.’ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अमेरिका दौ-यातील आपले अनुभव ‘दिव्य मराठी’ला सांगितले.


16 ते 29 ऑगस्ट दरम्यान दौरा करून परतल्यानंतर अण्णांचे स्वास्थ्य काहीसे बिघडल्याने सध्या ते फारसे सार्वजनिक कार्यक्रमांत जात नाहीत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी दररोज लांबून लोक राळेगणमध्ये येत आहेत.


दौ-याविषयी अण्णा म्हणाले, ‘सभेत झोळी पसरून मिळणा-या पैशांवर आमचे आंदोलन सुरू आहे. त्याच्याच जोरावर सामान्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही सरकारला माहितीच्या अधिकारासह सात कायदे करायला लावले. त्यामुळे या आंदोलनाबाबत अमेरिकन लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. स्वागतासाठी न्यूयॉर्कमधील रस्त्यावर दोन लाखांहून अधिक जनसागर उसळला होता. तो अनुभव अक्षरश: अभूतपूर्व होता. अनेक लोकांनी आम्ही तुमच्या आंदोलनात आम्ही काय योगदान देऊ शकतो?, अशी विचारणा केली. त्यामुळे आमच्या आंदोलनाला अधिक बळ मिळणार आहे. ही चळवळ कोणत्याही उद्योगपतीचा पैसा किंवा मोठ्या लोकांच्या देणग्या न घेता फक्त जनतेसमोर झोळी पसरून मिळणा-या पैशांवर सुरू आहे. हे जगात विरळे उदाहरण ठरावे. या आंदोलनामुळे लोकशाही सशक्त करणारे सात कायदे दिले, याची अमेरिकेतील लोकांना मोठी उत्सुकता असल्याचे दिसले.’


बारा दिवसांच्या दौ-यात 30 सभा
‘माझ्या स्वागतासाठी न्यूयॉर्कवासीयांनी संपूर्ण रस्ताच परवानगी घेऊन आरक्षित केला होता. मी असलेल्या गाडीत माइक लावले होते. लोक दुतर्फा उभे होते. त्यांना रोखण्यासाठी लावलेले अडथळे झुगारून लोक हस्तांदोलन करण्यासाठी धाव घेत होते. विशेष म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांबरोबर स्थानिक लोकही कुतूहलाने त्यात सहभागी झाले होते. नंतर झालेल्या सभेला मिळालेला प्रतिसादही अभूतपूर्व होता. बारा दिवसांच्या दौ-यात अमेरिकेतील सहा राज्यांत 30 सभा झाल्या. अनेक लोकांनी आमच्या आंदोलनात ते काय योगदान देऊ शकतात, याची विचारणा केली. मी त्यांना पैसा नको, पण आंदोलनासाठी तांत्रिक मदत मागितली. कारण आम्ही सोशल साइटचा वापर करतो, तो मर्यादित आहे. त्यांचे यातील तंत्रज्ञान अद्ययावत आहे. ते देण्यासाठी काही लोक भारतात येणार आहेत. त्यामुळे आंदोलन जगभर पोहोचवण्यासाठी मदत होईल.’


दररोज साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास
‘तीन विद्यापीठांत भाषणे झाली. दोन गव्हर्नरबरोबर जेवण घेण्याचाही मान मिळाला. दोन ठिकाणांतील अंतर जास्त असल्याने दररोज किमान साडेतीनशे किमी प्रवास व्हायचा. तीन ठिकाणी तर विमानाने जावे लागले. सर्व ठिकाणी भाषणे हिंदीतच झाली. व्यासपीठावर त्याचा अनुवाद करून सांगितला जात असल्याने लोकांपर्यंत भावना पोहोचल्या. विद्यापीठांतील भाषणांनी विद्यार्थी खूप प्रभावित झाले. त्यांनी चळवळीची प्रेरणा, आलेल्या अडचणी, त्यातून मार्ग कसा काढला याबाबत अनेक प्रश्न विचारले. ’


पर्यावरणविषयक अतिशय जागरूकता
‘अमेरिकन नागरिक पर्यावरणविषयक अतिशय जागरूक आहे. प्रवासादरम्यान रस्त्यांवर सर्वत्र गर्द झाडी दिसली. विशेष म्हणजे झाडांमधून उच्च दाबाच्या वीजवाहिन्या गेलेल्या आहेत. कोठेही वृक्षतोड होत नाही. फक्त तारांना वीजरोधक आवरण लावलेले असते. आपल्याकडे याचे अनुकरण करणे आवश्यक आहे.’


अडीच टन टोप्यांची आयात
‘सभेत येणारे सर्व लोक ‘मैं भी अण्णा हूं’ लिहिलेल्या गांधी टोप्या घालून येत असत. त्या कुठून आणल्या? याबाबत चौकशी केली असता भारतातून खास अडीच टन टोप्या मागवण्यात आल्या होत्या, असे संयोजकांनी सांगितले.’
न्यूयॉर्क टाइम्सने घेतली मुलाखत
अण्णांच्या दौ-याची तेथील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी मोठी दखल घेतली. न्यूयॉर्क टाइम्सने त्यांची तासभर मुलाखत घेतली. अनेक चॅनलवर त्यांच्या मुलाखती झळकल्या. तेथील रेडिओवरही मुलाखती झाल्या. या प्रतिसादामुळे आंदोलनाला मोठे बळ मिळेल, अशी अण्णांना अपेक्षा आहे.


सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा
अमेरिकन लोक पर्यावरणविषयी अतिशय जागरूक व प्रामाणिक असतात, हे स्पष्ट करण्यासाठी अण्णांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले, पेट्रोलियम पदार्थांच्या वापरावर नियंत्रणासाठी तेथे जागोजागी सायकल स्टँड असतात. तेथे सायकली लावलेल्या असतात. कोणीही सायकल उचलायची व आपल्या इच्छित स्थळी जाऊन तेथे जवळच्या स्टँडवर ती परत लावायची अशी व्यवस्था आहे. आपल्याकडे अशी व्यवस्था झाल्यास किती सायकली तेथे राहतील? हा प्रामाणिकपणा आपल्याकडे केव्हा येईल, असा विचार आपल्या मनात सतत येत होता.


दौ-यावर
डॉक्युमेंटरी

या दौ-यावर डॉक्युमेंटरी होत आहे. त्यासाठी दोन व्हिडिओग्राफर व एक फोटोग्राफर सतत अण्णांसोबत होते. त्यांच्या चलचित्रणातून डॉक्युमेंटरी तयार करून ती जगभर दाखवण्यात येणार आहे. काही चित्रण करण्यासाठी संबंधित व्हिडिओग्राफर राळेगणसिद्धीतही येणार आहेत.