आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amir Khan Crying After Hearing The Death Of Samir

समीरच्या निधनाचे वृत्त ऐकताच आमिर खान गहिवरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ज्याच्यासाठी जगाच्या पाठीवरील कोणत्याही रुग्णालयाचा खर्च उचलण्यास तो तयार होता, अशा स्नेहालय संस्थेतील समीरच्या निधनाचे वृत्त ऐकताच अभिनेता आमिर खान यालाही रविवारी गहिवरून आले. 26 जानेवारीला आमिर खान स्नेहालयात आला होता, त्या वेळीही समीरची अवस्था पाहून त्याला अश्रू अनावर झाले होते.

जन्मत: एचआयव्हीबाधित व मूकबधिर असलेल्या समीरला सहा वर्षांपूर्वी अज्ञात व्यक्तीने नगरच्या रेल्वेस्टेशन परिसरात सोडून दिले होते. चाइल्डलाइनला ही माहिती मिळताच त्यांनी समीरला आधार देत त्याच्यावर उपचार सुरू केले. विविध वैद्यकीय चाचण्यांअंती एचआयव्हीसोबत त्याला एसएसपीई हा असाध्य आजार असल्याचे निदान झाले. अशा परिस्थितीतही स्नेहालय व चाइल्डलाइन कार्यकर्त्यांच्या आधाराने समीर सुमारे सहा वर्षे मृत्यूशी निकराची झुंज देत होता. मूकबधिर असल्याने त्याला आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यात खूप र्मयादा येत होत्या. केवळ हातवारे करुनच सर्वजण त्याच्याशी संवाद साधायचे. चंचल आणि मूकपणे सर्वांशी संवाद साधणारा निरागस समीर असा अचानकपणे निघून गेला, हे दु:ख पचवणे स्नेहालयातील सर्वांनाच अवघड झाले. आमिरलाही त्याचा धक्का बसला. स्नेहालयाचा आदर्श घेऊन देशातील प्रत्येकाने कर्तव्य भावनेने वंचितांसाठी सेवाकार्य करणे गरजेचे आहे, असे आमिरने शोकसंदेशात म्हटले आहे.


समर्पित सेवाकार्य
स्नेहालयातील चंद्रकांत शेंबडे, अजय सातोटे, गीता सिंग, मंगल नाईक, दीपाली लांडे, रेणुका दहातोंडे आदी कार्यकर्ते सर्मपित वृत्तीने समीरची सेवा करायचे. त्यांना बालरोगतज्ज्ञ डॉ. शहेनाज शेख यांनी सर्वतोपरी मोफत वैद्यकीय मदत उपलब्ध केली. व्यवसायाने इंजिनिअर असणारी व सध्या पुण्यात स्थायिक असलेली सुनीता जोशी त्याच्या औषधोपचाराचा सर्व खर्च करीत होती.