आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटीच्या मागण्यांबाबत 11 ला सर्वसाधारण सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - चार दिवसांपासून बंद असलेली शहर बससेवा (एएमटी) गुरूवारपासून पूर्ववत सुरू होत आहे. शनिवारी (29 जून) सायंकाळी शहराबाहेर हलवण्यात आलेल्या सर्व बस पुन्हा रूजू झाल्या. दरम्यान, एएमटी व्यवस्थापनाच्या मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 11 जुलैला महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे.

एएमटी बंद झाल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच नोकरदारांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली होती. काही रिक्षाचालकांनी एएमटी बंद झाल्याचा आनंद फटाके फोडून साजरा केला. दरम्यान, महापौर शीला शिंदे यांनी एएमटी सुरू राहावी, यासाठी आमदार अनिल राठोड व आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासह ठेकेदार प्रसन्ना पर्पलशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत सर्वसाधारण सभेत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू करण्यास व्यवस्थापनाने हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार शहराबाहेर हलवण्यात आलेल्या सर्व बस बुधवारी पुन्हा आणण्यात आल्या. गुरूवारी सकाळपासून नगरकरांची एएमटी पुन्हा धावू लागेल.

एएमटी व्यवस्थापनाच्या मागण्यांबाबत 11 जुलैला होणार्‍या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर बस उभ्या करण्यासाठी माळीवाडा बसस्थानकामागील जागेचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार आहे.

एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांना पत्र
माळीवाडा बसस्थानकाच्या मागील जागा एएमटीसाठी मिळावी, यासाठी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी अनुकूलता दाखवली आहे. परंतु एका व्यक्तीने संबंधित जागा एएमटीसाठी देऊ नका, असे पत्र कपूर यांना दिले. तथापि, येत्या तीन दिवसांत जागेचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे महापौरांनी सांगितले.