आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर बससेवेचे पुनरागमन; विद्यार्थ्यांची गैरसोय टळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - चार दिवसांच्या खंडानंतर शहर बससेवा (एएमटी) गुरूवारी पूर्ववत सुरू झाल्याने हजारो प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. सकाळपासूनच प्रवाशांनी एएमटी थांब्यांवर गर्दी केली होती. त्यामुळे शहर बससेवा बंद झाल्याने फटाके फोडून आनंद साजरा करणार्‍या रिक्षाचालकांच्या आनंदावर मात्र विरजण पडले.

फेब्रुवारी 2011 मध्ये सुरू झालेल्या एएमटीला मागील तीन महिन्यांपासून ग्रहण लागले होते. वारंवार पाठपुरावा करूनही सेवेत येणार्‍या अडचणींकडे मनपा पदाधिकारी व प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे वैतागलेल्या एएमटी व्यवस्थापनाने अखेर प्रशासनाला अंतिम नोटीस देत 1 जुलैपासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेल्या मुदतीच्या एक दिवस आधीच (30 जून) अचानक सेवा बंद करून सर्व बस शहराबाहेर हलवण्यात आल्या. बससेवा बंद झाल्याने हजारो नागरिकांची गैरसोय झाली.

एएमटी सुरू होताच प्रवाशांनी गुरूवारी सकाळपासूनच थांब्यांवर गर्दी केली. माळीवाडा बसस्थानक, दिल्लीगेट, प्रेमदान चौक, भिस्तबाग नाका, केडगाव, निर्मलनगर आदी ठिकाणी प्रवासी एएमटीची प्रतीक्षा करत होते. बससेवा बंद होताच पहिल्या दिवशी एएमटी थांब्यांचा ताबा घेणारे रिक्षाचालक गुरूवारी एएमटी थांब्यांकडे फिरकले नाहीत.

सेवा सुरू राहावी एवढीच अपेक्षा
एएमटी ही नगरकरांची गरज आहे. ती बंद झाली, तर रिक्षाचालकांच्या मनमानीला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे एएमटी सुरू ठेवण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत. आतापर्यंत एएमटीने आम्हाला सुरक्षित व अखंड सेवा दिली. यापुढेही एएमटीची सेवा अशीच मिळत राहावी, एवढीच अपेक्षा आहे.’’ यशवंत बागडे, ज्येष्ठ नागरिक

आता लक्ष सर्वसाधारण सभेकडे
महापौर शीला शिंदे यांच्या प्रयत्नांनंतर एएमटी पूर्ववत सुरू झाली. एएमटी व्यवस्थापनाच्या मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी 11 जुलैला सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत अपेक्षित निर्णय झाला नाही, तर एएमटी व्यवस्थापन पुन्हा सेवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते. एएमटीच्या अवास्तव मागण्या यापूर्वीच स्थायी समितीने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे एएमटी सुरू राहावी, यासाठी नफा-तोट्याचा विचार न करता सत्ताधारी व विरोधी नगरसेवक एएमटीच्या मागण्या सर्वसाधारण सभेत मान्य करतील का, यावरच एएमटीचे भवितव्य अवलंबून आहे.

रिक्षाचा खर्च वाचला
एएमटी बंद झाल्याने चार दिवस रिक्षाने शाळेत जावे लागले. एएमटीसाठी चार रुपये द्यावे लागायचे, रिक्षाला मात्र आठ रुपये लागायचे. आता एएमटी पुन्हा सुरू झाल्याने रिक्षाचा खर्च वाचला. एएमटीकडून सवलतीच्या दरात पास मिळत असल्याने येण्या-जाण्याचा मोठा खर्च वाचतो. त्यामुळे ही बससेवा नियमित चालायला हवी.’’ वैष्णवी कोतकर, विद्यार्थिनी