आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटी सेवा 10 एप्रिलपासून बंद करण्याचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शहर बससेवेला (एएमटी) 75 लाखांचा तोटा झाला आहे, असे नमूद करून 10 एप्रिलपासून बससेवा बंद करण्याचा इशारा ठेकेदार प्रसन्ना पर्पल मोबिलिटी सोल्युशन्सने मंगळवारी महापालिकेला दिला.

परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा अवैध प्रवासी वाहतूक थांबवण्यासाठी कारवाई करत नसल्यामुळे तोटा वाढत आहे. याबाबत ठेकेदाराने मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपाने शहर बससेवेच्या प्रवासीभाड्यात वाढ करण्याचा व शहरातील रिक्त भूखंड बससेवेच्या आगारासाठी देण्याचा निर्णय घेतला असला, तरी तेवढय़ाने भागणार नाही. कारण शहरात विनापरवाना अँपेरिक्षांमधून होणारी अवैध प्रवासी वाहतूक दिवसेंदिवस वाढते आहे. शहरातील सुमारे 4 हजारपैकी केवळ 450 रिक्षांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या काही वाहनांचे पासिंग पुणे, बीड व र्शीरामपूर येथील आहे.

अपेरिक्षामध्ये केवळ 3 प्रवासी बसवणे बंधनकारक आहे. पण अशा वाहनांमधून सर्रास 8 ते 10 प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक केली जाते. यावर परिवहन कार्यालयाचे नियंत्रण नाही. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शहरातील विद्यार्थी, युवती व महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या बैठकीत बसथांब्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत रिक्षा थांबण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पोलिस व परिवहन विभाग कोणतीही कारवाई करीत नाहीत, असा आरोपही ठेकेदाराने केला आहे.
एएमटी बंद झाल्यास नगर शहरातील विद्यार्थी, महिला व नोकरदारांची मोठी गैरसोय होणार आहे.