आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटीला जागा; दोन दिवसांत निर्णय देण्याचे नियंत्रक बंड यांचे आश्वासन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहर प्रवासी बससेवेच्या एएमटीला बस थांबवण्यासाठी माळीवाडा बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेली सायकल स्टँडची जागा देण्याबाबत दोन दिवसांत निर्णय देऊ, असे आश्वासन एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक दिलीप बंड यांनी जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार व महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांना दिले.

एएमटीच्या अडचणी दूर करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. महापौर शीला शिंदे, शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, आरटीओ विलास कांबळे, एएमटीचे ठेकेदार प्रसन्ना पर्पलचे संचालक रोहित परदेशी, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप, माजी महापौर भगवान फुलसौंदर, स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, अभियंता परिमल निकम आदी यावेळी उपस्थित होते.

माळीवाडा बसस्थानकात एएमटीच्या दोन बसेस थांबवण्यासाठी जागा मिळावी, याबाबत दोन दिवसांत मुंबईत परिवहनमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावर बंड म्हणाले, मनपा प्रशासनाने ज्या जागेची मागणी केली आहे, तेथे सायकल स्टॅण्ड व टपाल विभागाचे काम सुरू असते. त्यामुळे ही जागा देणे शक्य नाही.

महापालिका ही जागा भाडेतत्त्वावर मागत आहे. शक्य असेल तर जागा द्या, असे जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. आरटीओ कांबळे म्हणाले, शहर बससेवेसाठी 19 बसथांबे निश्चित केले असून या थांब्यांवर फलक लावण्यात यावेत. त्यामुळे अनधिकृत रिक्षांवर कारवाई करता येईल. दोन दिवसांत या थांब्यांवर फलक लावणार असल्याचे निकम यांनी सांगितले.

उबेद शेख यांचे लोटांगण
बैठक आटोपून मनपा आयुक्त खाली येताच काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनी सीआयव्ही कॉलनीतील ड्रेनेजच्या प्रश्नावरून त्यांचे वाहन अडवले. स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे, नगरसेवक दिलीप सातपुते यांच्यासमोर हा प्रकार घडला. आश्वासनानंतर शेख यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आयुक्त तब्बल दोन तासांनी रवाना झाले.

एएमटी सेवा बंद करण्याची परवानगी द्या
शहरात फक्त 500 रिक्षांना अधिकृत परवाने आहेत. पांढर्‍या रिक्षांना परवाने नसतानाही त्या धावतात. बीड, र्शीरामपूर, परळी या भागातील रिक्षाही इथे धावतात. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. दहा लाखांचे नुकसान होत असतानाही आम्ही एएमटी चालवत आहोत. बससेवा बंद करण्यासाठी मनपाला नोटीस दिली असून खिशातून पैसे घालून ही सेवा सुरू ठेवणे शक्य नाही. त्यामुळे ही सेवा बंद करण्यासाठी आम्हांला परवानगी द्यावी, असे ‘प्रसन्ना’चे संचालक रोहित परदेशी यांनी सांगितले.

महापालिकेचे काही सांगता येत नाही..
एएमटीसाठी जागा द्या, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्यावर प्रारंभी बंड यांनी विरोध दर्शवला. जिल्हाधिकार्‍यांनी तब्बल तीन वेळा जागा द्या, अशी सूचना केल्यानंतर बंड यांनी दोन दिवसांत सांगतो, असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘ माझे थोडेच हे काम आहे. शक्य असेल तर जागा द्या. ही जागा घेण्यात महापालिकेचा दुसरा काय उद्देश आहे?’’ महापालिकेचे काही सांगता येत नाही, असा टोला जिल्हाधिकार्‍यांनी लगावला

3200 रिक्षांना अधिकृत परवाने
शहरात 3 हजार 200 रिक्षांना अधिकृत परवाने आहेत. 1972 पासून राज्य सरकारने परवाने देणे बंद केले आहे. जे 2 हजार 800 परवाने रद्द करण्यात आले आहेत, त्यांचे नूतनीकरण झाल्यास अनधिकृत रिक्षांवर कारवाई करता येईल. अन्य जिल्ह्यांतील रिक्षा येऊ नये, असा काही कायदा नाही.
- विलास कांबळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

वाहतूक शाखेने काय कारवाई केली?
अनधिकृत रिक्षांवर काय कारवाई केली, असा प्रश्न जिल्हाधिकार्‍यांनी वाहतूक शाखेच्या अधिकार्‍यास विचारला. त्यावर सहायक पोलिस निरीक्षक सचिन सानप म्हणाले, गेल्या पाच महिन्यांत अनधिकृत रिक्षांवर कारवाई करून 14 लाख 21 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईची गती वाढवण्याची सूचना केली.