आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटी उद्यापासून पुन्हा सुरू होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - एएमटीने प्रवास करणार्‍या नगरकरांसाठी दिलासा देणार्‍या घडामोडी गेल्या दोन दिवसांत घडल्या. महापालिका प्रशासन व ठेकेदार प्रसन्ना पर्पल व्यवस्थापनात झालेल्या बैठकीत गुरुवार (4 जुलै) पासून एएमटी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेकेदाराच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्यासाठी लवकरच महासभा घेण्याचे आश्वासन महापौर शीला शिंदे यांनी दिल्याने हा निर्णय झाला.

एएमटी सेवा बंद होऊ नये, यासाठी मनपा प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न चालवले होते. मात्र, निश्चित तोडगा निघत नसल्याने ठेकेदाराने 29 जूनला शहर बससेवा बंद केली. त्यामुळे या सेवेचा लाभ घेणार्‍या 17 हजार नगरकरांची गैरसोय झाली. तसेच, या बसच्या 135 चालक-वाहकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधार्‍यांसाठी ही बाब अडचणीची ठरणार होती. त्यातच राजकीय वातावरण तापून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या होत्या. राजकीय साठमारीतच एएमटीचा बळी गेल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी याबाबत सविस्तर वृत्तही प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे पर्यायी बससेवा सुरू करण्याची तयारी नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी दाखवली होती. या सर्वांचा परिणाम होऊन सत्ताधार्‍यांनी मंगळवारी सायंकाळी एएमटी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत यश मिळवले.

प्रसन्नाचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन्न पटवर्धन यांच्याशी आमदार अनिल राठोड, आयुक्त विजय कुलकर्णी, अभियंता परिमल निकम, नगरसेवक संभाजी कदम, माजी नगरसेवक अनिल शिंदे, विजय बोरुडे आदींनी सोमवारी (1 जुलै) चर्चा केली. मंगळवारी व्यवस्थापक दीपक मगर व रोहित परदेशी यांच्यासमवेत महापौर शिंदे यांच्या दालनात बैठक झाली. ठेकेदाराच्या अडीअडचणीबाबत लवकरच महासभा घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे परदेशी यांनी 4 पासून बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला आयुक्त कुलकर्णी, सभागृह नेते अशोक बडे, उपायुक्त महेश डोईफोडे, अभियंता निकम, नगरसेवक कदम, दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.

जाणीवपूर्वक बैठकीला टाळले
वाहनप्रतीपूर्ती भत्त्यापोटी महापालिका दरमहा सात ते आठ लाख रुपयांचा खर्च करते. शहर बससेवा सुरू ठेवण्यासाठी उपमहापौर गीतांजली काळे यांनी वाहनभत्यापोटी त्यांना मिळणारे 22 हजार रुपये शहर बससेवेचा तोटा भरून काढण्यासाठी देण्याची तयारी दर्शवली आहे. इतर अधिकारी व पदाधिकार्‍यांनी हा मार्ग अवलंबावा, असे आवाहन त्यांनी केले. बससेवा हा जिव्हाळ्याचा विषय असतानाही यासंदर्भात होणार्‍या बैठकांना जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप काळे यांनी केला.

आश्वासनानंतर व्यवस्थापन तयार
एएमटी सेवेबाबत दोन दिवस महापौरांनी प्रसन्ना पर्पलच्या व्यवस्थापनाबरोबर चर्चा केली. प्रवाशांची गैरसोय व एएमटीच्या अडचणीबाबत समन्वयाने निर्णय घेण्यात येईल, त्यासाठी महासभेत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर सेवा सुरू ठेवण्यासाठी एएमटी व्यवस्थापन तयार झाले.’’ दीपक मगर, व्यवस्थापक, एएमटी

अभाविपचे आंदोलन
एएमटी पुन्हा सुरू व्हावी, या मागणीसाठी संघटन मंत्री प्रमोद कराड यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे एएमटी स्थानकावर मंगळवारी निदर्शने करण्यात आली. शहर बससेवा चुकीच्या धोरणांमुळे बंद झाली आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांच्या हितासाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली.