आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 जुलैपासून एएमटी बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आर्थिक तोट्यामुळे शहर बससेवा (एएमटी) सुरू ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे 1 जुलैपासून ही सेवा बंद करण्यात येत आहे, अशी नोटीस ठेकेदार ‘प्रसन्ना पर्पल’ने सोमवारी महापालिका प्रशासनाला दिली. दरम्यान, सर्व प्रकारचे सहकार्य करूनही ठेकेदार शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांनी केला आहे.

फेब्रुवारी 2011 मध्ये सुरू झालेली एएमटी नगरकरांना उपयुक्त असली, तरी सध्या या सेवेला अडचणींचे ग्रहण लागले आहे. आर्थिक तोट्यामुळे सेवा सुरू ठेवणे अशक्य आहे, अशी नोटीस ठेकेदाराने 10 एप्रिल 2013 रोजी मनपा प्रशासनाला दिली होती. त्यानंतर प्रशासन व पदाधिकार्‍यांनी सेवा सुरू ठेवण्यासाठी हालचाल सुरू केली. वेळोवेळी होणार्‍या डिझेलच्या दरवाढीमुळे प्रवासी भाड्यात वाढ करण्याची परवानगी ठेकेदाराला देण्यात आली. तरीही सेवा बंद करण्याबाबत ठेकेदाराने प्रशासनाला वेळोवेळी नोटिसा दिल्या. सेवा सुरू करण्यासाठी संस्थेला 3 कोटी 25 लाखांची गुंतवणूक करावी लागली. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक टिकिटींग मशिन व अन्य अत्याधुनिक सुविधांसाठी 25 लाखांची वेगळी गुंतवणूक करावी लागली. त्यामुळे बससेवेला सुरूवातीपासूनच प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, गेल्या वर्षभरापासून मोठय़ा प्रमाणात तोटा होत असल्याने सेवा सुरू ठेवणे कठीण झाले आहे. तरीदेखील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी सेवेत खंड पडू दिला नाही. मनपाकडून अपेक्षित सहकार्याची वेळोवेळी मागणी केली, परंतु कोणतेच सहकार्य मिळाले नाही. एप्रिलमध्ये दिलेल्या नोटिशीची वैधता अबाधित ठेवून आतापर्यंत सहकार्याची प्रतीक्षा केली. तरी देखील मनपाकडून काहीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. 21 जूनला झालेल्या स्थायी समितीच्या सभेतही सर्व मागण्या फेटाळण्यात आल्या. त्यामुळे नाईलाजास्तव 1 जुलैपासून सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे ठेकेदार संस्थेचे म्हणणे आहे.

दरम्यान, एएमटी सुरू राहावी, यासाठी मपनाने आतापर्यंत सर्वतोपरी सहकार्य केले. तरी देखील ठेकेदार सेवा बंद करण्याची धमकी देऊन मनपा व शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप स्थायी समितीचे सभापती वाकळे यांनी केला आहे. संस्थेने सेवा सुरू ठेवण्याबाबत दहा वर्षांचा करार केला आहे. त्यामुळे त्यांना मध्येच सेवा बंद करता येणार नाही. तसे झाल्यास मनपा न्यायालयात जाईल, असे त्यांनी सांगितले.

मागण्यांचा विचार होत नाही
एएमटी सुरू ठेवण्याबाबत दहा वर्षांचा करार करण्यात आला असला, तरी तीन महिने अगोदर नोटीस देऊन हा करार संपुष्टात येऊ शकतो. करारानुसार सेवा सुरू ठेवण्यासाठी मनपा बंधन आणू शकत नाही. वेळोवेळी करण्यात आलेल्या मागण्यांचा विचार होत नसल्यामुळेच सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.’’ दीपक मगर, शहर व्यवस्थापक, एएमटी

सेवा बंद पडू देणार नाही
वेळोवेळी बैठका घेऊन शहर बससेवेतील काही अडचणी सोडवल्या आहेत. एएमटीसाठी माळीवाडा बसस्थानकाच्या मागील जागा मिळावी, यासाठी पाठपुरावा केला. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी जागा देण्यास अनुकूलता दाखवली आहे. सेवा सुरू ठेवण्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.’’ शीला शिंदे, महापौर

एएमटी तोट्यात नाहीच..
एएमटीला आतापर्यंत सुमारे 1 कोटींचा तोटा झाला असल्याचा दावा ठेकेदार संस्थेने केला आहे. मात्र, त्यांचा हा दावा खोटा असल्याचे भिंगार राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मतीन सय्यद यांचे म्हणणे आहे. ठेकेदार संस्थेने एएमटीच्या जमा-खर्चाचा कोणताही लेखी हिशेब सादर केला नसल्याचे सय्यद म्हणाले.

निर्णय महापौर व स्थायी समिती घेणार
शहर बससेवा 1 जुलैपासून बंद करण्याबाबतचे पत्र प्रसन्ना पर्पलकडून मिळाले आहे. त्याबाबत महापौरांना कळवण्यात आले आहे. महापौर व स्थायी समिती यांच्यामार्फत शहर बससेवा सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.’’ डॉ. महेश डोईफोडे, उपायुक्त