आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ananddham Jain Social Foundation Cultural Program Deepak Deshpande

आनंदधाममध्ये रंगला दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आनंदधाम येथे जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेत महाराष्ट्राचे पहिले हास्यसम्राट दीपक देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाला नगरकरांनी रविवारी भरभरून प्रतिसाद दिला. देशपांडे यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून श्रोत्यांना अक्षरश: पोट धरून हसायला लावले.

हास्यकल्लोळचा प्रयोग सादर करताना देशपांडे यांनी संवादफेक, आवाजातील चढउतार, भाषेवरील प्रभाव व भाषा शैलीच्या माध्यमातून शाळेतील गुरुजी, पोलिस खात्यातील इन्स्पेक्टर, बस स्थानकावरील कन्ट्रोलर, दह्याची विक्री करताना गवळ्याने दिलेली आरोळी, सोलापूरच्या मराठी भाषेवर असलेला कानडी, तेलुगू व हिंदी भाषेचा प्रभाव, स्वत:ला अति हुशार समजणारा पक्का पुणेरी आदी बाबींवर नेमकेपणाने प्रकाश टाकत देशपांडे यांनी कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. ‘निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपला गं बाई’ हे गाणे उलटे म्हणून दाखवत, तसेच लावणी म्हणणारी गायिका भक्तिगीत म्हणताना गाण्याचा स्वभाव कसा बदलतो, याचे प्रात्यक्षिक दावताच उपस्थितांमध्ये अक्षरश: हास्याचे फवारे उडाले.

राजकीय नेत्यांच्या आवाजाची देखील हुबेहुब नक्कल यावेळी देशपांडे यांनी केली. निवडणूक प्रचारसभेत नेत्यांच्या आवाजाची पट्टी ठरलेली असते. त्यामुळे त्यांच्या भाषणांचे आवाज सहज ओळखता येतात. शरद पवार, आर. आर. पाटील, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुशीलकुमार शिंदे आदी राजकीय नेत्यांच्या भाषणातील खुबी देशपांडे यांनी श्रोत्यांसमोर ठेवल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे हिंदीमिर्शित मराठी बोलणेही त्यांनी हुबेहुब श्रोत्यांसमोर ठेवले, त्यामुळे आनंदधाममध्ये हास्यकल्लोळ निर्माण झाला.