आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anandraj Ambedkar Rally At Kharda, Divya Marathi

नितीन आगे खूनप्रकरणी दगाबाजी केल्यास आंदोलन - आनंदराज आंबेडकर यांचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड - आगे प्रकरणामुळे पोलिस व प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. आगे कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे पुन्हा पुरवणी अहवाल तयार करून दोषींची नावे यात घेण्यात यावीत. यात दगाबाजी करू नका; अन्यथा रिपब्लिकन सेना राज्यभर आंदोलन उभारेल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
रिपब्लिकन सेनेच्या वतीने 28 मे रोजी जामखेड शहरातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर तहसीलवर मोर्चा नेऊन त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ निकाळजे, स्वाभिमानी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे, अँड. संघराज रूपवते, राजू आढाव, विलास निकम, कुंदन तुपेरे, अशोक गायकवाड, योगेश सदाफुले, विकी सदाफुले, महादेव काळे आदी उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, दलित चळवळ सक्षमपणे उभी करण्यासाठी गाव तेथे रिपब्लिक सेना आपण स्थापन करणार असून यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन एकसंध ताकदीने लढण्याची वेळ आली आहे. काही नेते आपला हुजरेगिरी करण्यातच आपला वेळ घालवत आहेत. अशा नेत्यांना समाजाने बाजूला सारले पाहिजे. ज्याला आपण गुरू समजतो. त्याच शिक्षकांनी नितीन आगे याला मृत्यूच्या दाढेत सोडून दिले, अशा शिक्षकांना या नितीनच्या खूनप्रकरणात आरोपी करण्यात यावे.
तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे करावा. दगाबाजी करू नये; अन्यथा जर त्यांना जमत नसेल, तर तपासाची सूत्रे सीआयडीकडे देण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली. या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रदीप कुलकर्णी यांना देण्यात आले. लाँगमार्च व सद्भावना रॅलीची खर्डा संसद यांना पोलिस प्रशासनाने बंदी आदेश असल्याची नोटीस दिली होती. ती झुगारून लाँगमार्च खडर्य़ाकडे रवाना झाला होता.