आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेतीमिश्रीत चिक्कीचा पुरवठा अखेर बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अंगणवाड्यांतील मुलांना दिल्या जाणार्‍या राजगिरा चिक्कीत रेतीचे कण आढळल्याचा आरोप पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. अधिकारी पदाधिकार्‍यांनी या चिक्कीचा नमुना तपासला असता त्यात तथ्य आढळल्याने जिल्ह्यातील चिक्कीचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. महिला बालकल्याण समितीने गुरुवारी यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन हा निर्णय घेतला.

जिल्हाभरात सुमारे पाच हजार अंगणवाड्या असून त्यामध्ये प्राथमिक पूर्व शिक्षण घेणार्‍या बालकांना पोषण आहार दिला जातो. हा आहार आरोग्यदायी आहे, की अपायकारक याची कोणतीही शहानिशा केली जात नसल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी सभापती कार्ले यांनी चिक्की पुरवठादारांचे पितळ उघडे पाडले. चिक्कीचा नमुना जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड सभापतींसमोर त्यांनी सादर केला. सुमारे साडेतीन लाख बालके अंगणवाडीत असून निकृष्ट राजगिरा चिक्कीमुळे बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अधिकारी पदाधिकार्‍यांनी ही चिक्की खाल्ल्यानंतर त्यांना त्यात कचकच लागली.

महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे यांनी प्रकल्प अधिकार्‍यांना या चिक्कीचा पुरवठा तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले. आतापर्यंत पाच प्रकल्पांतील चिक्कीचे नमुने घेण्यात आले आहेत. गुरुवारी महिला बालकल्याण समितीची सभा सभापती नंदा वारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. सदस्य आशा मुरकुटे, कांचन मांढरे, योगिता राजळे, निर्मला गुंजाळ, सकुबाई केदार सभेस उपस्थित होते. आयुक्त कार्यालयाकडून पुरवठा झालेल्या राजगिरा चिक्कीत कचकच आढळल्याने जून रोजी प्रकल्पस्तरावरील पाकिटांचा पंचनामा करण्यात आला. ही पाकिटे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या मुंबई येथील कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठवली आहेत. ही चिक्की बालकांना खाण्यास देऊ नये, अशी सूचना दिल्याचे ससे यांनी सभेत सांगितले. यासंदर्भात यापूर्वी झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेतही चर्चा झाली. चिक्कीचा तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी अन्न आैषध प्रशासनामार्फत कारवाई होऊ शकते. तथापि, यासंदर्भात अजून फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समजली.

झेडपीकडून पुरवठा व्हावा
राजगिरा चिक्कीचा प्रकल्पस्तरावरूनच पुरवठा थांबवण्यात आला आहे. राज्यस्तरावरून आहाराचा पुरवठा करता हा पुरवठा जिल्हा परिषदेकडून करण्यात यावा. त्यावर आमचे नियंत्रण असेल. तसा ठरावही समितीने गुरुवारी केला आहे.'' नंदावारे, सभापती.

राज्यभरात झाला पुरवठा
अंगणवाडीतीलबालकांसाठी कोट्यवधी रुपयांची चिक्की राज्यभरात दिली जात आहे. नगरमध्ये प्रथमच हा प्रकार समोर आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. काही पाकिटांवर बच नंबर तारिख नसल्याचाही आरोप सभापती संदेश कार्ले यांनी केला आहे.

फौजदारी गुन्हा दाखल करा
बालकांना मातीमिश्रीत चिक्की दिली जाते. अन्नात भेसळ करणे हा गुन्हा असून याप्रकरणी तत्काळ संबंधित पुरवठादारावर गुन्हा दाखल करावा. हा प्रकार उघडकीस आणूनही अनेक ठिकाणी चिक्कीचे वाटप सुरू आहे. मगीपेक्षाही भयानक हा प्रकार आहे.'' संदेशकार्ले, सभापती, नगर तालुका पंचायत समिती.