आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणवाडी सेविकांचा पाथर्डीत रास्ता रोको, शासन दुर्लक्ष करत असल्‍याच्‍या निषेधार्थ आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - मागील सात दिवसांपासून राज्यभर सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याच्या निषेधार्थ येथील साईश्रद्धा अंगणवाडी संघटनेच्या वतीने सोमवारी शहरातील नाईक चौकात शेकडो अंगणवाडी सेविकांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विरोधात त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 
 
मानधनवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी ११ सप्टेंबरपासून राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून साईश्रद्धा अंगणवाडी संघटनेच्या वतीने नाईक चौकात दुपारी एक वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या राज्य अध्यक्ष सुमन सप्रे, सचिव स्मिता औटी, जिल्हाध्यक्ष अनिता पालवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी तालुकाध्यक्ष वनिता कावरे, नयना चाबुकस्वार, आशा बुधवंत, सुनीता मुखेकर, वैशाली शिरसाठ, अनिता राजगुरू, संगीता खेडकर, भारती चव्हाण, मिनाक्षी शेरकर, कविता काळे यांच्यासह शेकडो महिलांनी रस्ता अडवत घोषणा दिल्या. 
 
महिलांनी आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. संपूर्ण महाराष्ट्रात चार ठेकेदारांना काम दिले असून त्यांच्याकडून निकृष्ट दर्जाचा आहार पुरवला जातो. तो बंद करण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे. सकाळपासून शाळेतील पडेल ते काम अतिशय कमी मोबदल्यात आम्ही करतो. जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जेवढे पैसे लागतात, किमान तेवढे तरी वेतन शासनाने द्यावे. शासन पोकळ आश्वासन देऊन चालढकल करत आहे, असा आरोप करण्यात आला. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयापुढे मंगळवारी सर्व अंगणवाडी सेविका आंदोलन करणार अाहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी कॉम्रेड बन्सी सातपुते, अविनाश पालवे, सुभाष घोरपडे, प्रवीण वाघमारे उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...