आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Rathod News In Marathi, Dilip Gandhi, MP, Divya Marathi,Nagar

आमदार राठोड, दिलीप गांधी यांचे होणार मनोमीलन ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका निवडणुकीत एकमेकांना शह देण्याची एकही संधी शिवसेना आमदार अनिल राठोड व भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांनी सोडली नाही. गांधी यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने आता या दोघांत ‘पॅचअप’ (मनोमीलन) होणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. राठोड यांना विचारले असता ‘आधी त्यांचा अंतर्गत वाद निस्तारू द्या, मग पाहू..’ अशी मिश्किल प्रतिक्रिया देत त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली.
नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीमुळे भाजपमधील अंतर्गत वाद चिघळला आहे. गांधी यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी राजीनामा दिला. महापालिका निवडणुकीपासून राठोड यांच्याशीही मतभेद झाल्याने गांधी यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. राठोड व गांधी यांनी आपल्या मुलांना महापालिका निवडणुकीत उतरवले होते. परंतु दोघांनीही युतीचा धर्म न पाळता परस्परांच्या विरोधात भूमिका घेत विरोधी उमेदवारांना मदत केली. त्यामुळे राठोड यांचे पुत्र विक्रम यांना पराभवाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे दुखावलेले आमदार राठोड गांधी यांना मदत करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये राठोड यांचा मोठा जनसंपर्क आहे. शिवाय भाजपचे आमदार राम शिंदे, प्रताप ढाकणे यांच्यासह राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्याशी राठोड यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शहरातील मतांची संख्या पाहता या मतदारसंघात राठोड यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.


पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच गांधी यांनी नाराजांची मनधरणी सुरू केली. भाजपचे आमदार राम शिंदे, राहुरीचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह पक्ष कार्यकारिणीतील काही पदाधिकार्‍यांची मनधरणी करण्यात त्यांना यश मिळाले, परंतु ढाकणे यांची नाराजी ते दूर करू शकले नाहीत. ढाकणे यांनी राजीनामा देऊन गांधी यांच्याविरोधात उघडपणे बंड पुकारले. आता राठोड यांची मनधरणी करण्याचे मोठे आव्हान गांधी यांच्यासमोर आहे. परंतु आधी पक्षातील अंतर्गत वाद मिटवा, मग आमच्याकडे या, अशी भूमिका राठोड यांनी घेतली आहे. त्यातून गांधी कसा मार्ग काढतात, याकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


वाकचौरे विखेंचे उमेदवार
शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या खासदार वाकचौरे यांनी विश्वासघात करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ते काँग्रेसचे नव्हे, तर विखे यांचे उमेदवार आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांनी डिवचले, तर शिवसैनिक गप्प राहणार नाहीत. त्यासाठी हजारो शिवसैनिकांची जेलमध्ये जाण्याची तयारी असल्याचे राठोड यांनी सांगितले.राजकारण बदलतंय..
राज्यातील राजकारण बदलत आहे. लोक आता हुशार झाले आहेत. काँग्रेसच्या महागाई, भ्रष्टाचारामुळे लोक वैतागले आहेत. सध्या नरेंद्र मोदी यांच्यासाठी चांगले वातावरण आहे. भाजप व मोदी यांना शिवसेनेचा विरोध नाही. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये फिरून त्यांची कामे केली पाहिजेत, अन्यथा पुढील निवडणुकीत लोक धडा शिकवतात, असा टोलाही राठोड यांनी (गांधी यांचे नाव न घेता) लावला.

अण्णांची माफी मागणार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. याबाबत राठोड यांना विचारले असता ते म्हणाले, घोलप यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे नाहीत. त्यांच्यावरील आरोपांचा प्रश्न तेव्हाच मिटला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न पुन्हा समोर येऊ नये, अशी विनंती अण्णांना करणार आहे. त्यासाठी अण्णांची माफी मागणार असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.