आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Rathod News In Marathi, MLA, Sangram Jagtap, Mayor, Divya Marathi

महापौरांनाच लागले निवडणुकीचे डोहाळे,आमदार अनिल राठोड यांची जगताप यांच्यावर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दोनदा निवडून येऊन महापौर झाले, तो स्वत:चा प्रभाग अजून टँकरमुक्त करता आला नाही, मग हे शहराचा पाणीप्रश्न काय सोडवणार? आम्हाला निवडणूक नवीन नाही. आम्ही केवळ जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलने करतो. निवडणुकीचे डोहाळे आम्हाला नाही, तर तुम्हालाच लागले आहेत, अशी टीका आमदार अनिल राठोड यांनी रविवारी महापौर संग्राम जगताप यांच्यावर केली.
विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच राठोड यांनी पाणीप्रश्नासाठी आंदोलन केले, असा टोला महापौर जगताप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मारला होता. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार राठोड, माजी महापौर शीला शिंदे व शहरप्रमुख संभाजी कदम यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. राठोड म्हणाले, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी आमच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. त्यामुळे शिवसेनेने महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली. महापौर जगताप यांनी त्यास राजकीय रंग देऊन मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. आम्ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच आंदोलने करत नाहीत. माझ्यासाठी निवडणूक नवीन नाही. नगरकरांनी मला पाचवेळा निवडून दिले. त्यामुळे जगताप यांनी केलेली टीका बालिशपणाची आहे. निवडणुकीचे डोहाळे लागल्यामुळेच ते असे बोलत आहेत. सारसनगर भागातून ते दोनदा निवडून आले, महापौरही झाले. परंतु त्यांना आतापर्यंत स्वत:चा प्रभाग टँकरमुक्त करता आलेला नाही, ही शोकांतिका आहे. त्यांच्या दादागिरीमुळे नागरिक निमूटपणे त्रास सहन करत आहेत. केवळ पाणीप्रश्नच नाही, तर सर्वच बाबतीत त्यांची दादागिरी आहे, ही शहराच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. उपमहापौरांच्या केडगावातही पाण्याची मोठी बोंब आहे, असे सांगत पाणीप्रश्नाबाबत आता शहरात फिरणार असल्याचे राठोड म्हणाले.

शहराला पाच दिवसांपासून पाणी नाही, म्हणूनच आम्ही आंदोलन केले. पाच दिवसांपासून पाणी नसल्याचे आयुक्तांनीही मान्य केले. महापौरांनी मात्र राजकीय रंग देऊन पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केले. शहर सुधारित पाणी योजनेची अनेक कामे युतीच्या काळात मार्गी लागली आहेत. मुळानगर येथील रॅम्पचे बांधकाम, उंच टाक्या, अंतर्गत पाइपलाइन अशी अनेक कामे आधीच्या महापौर शिंदे यांनी पूर्ण केली, असे राठोड यांनी सांगितले.

राज्यात सत्ता असूनही जगतापांना कामे करता आली नाहीत. चार महिन्यांनी युतीची सत्ता येताच शहरासाठी दोनशे कोटींचा निधी आणू, असे राठोड यांनी ठणकावून सांगितले.

सावेडीचा पाणीपुरवठा पूर्ववत
एकीकडे पाणीप्रश्नावरून राजकीय चिखलफेक सुरू आहे, तर दुसरीकडे नगरकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने वसंत टेकडी येथे नियोजन कक्ष स्थापन केला आहे. ज्या भागाला पाणी मिळालेले नाही, त्या भागात प्राधान्याने पाणी सोडण्यात येत आहे. सावेडीचा पाणीपुरवठा आता सुरळीत झाला असला, तरी इतर ठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत आहे.

शिवसेनेचे महापौरांना सवाल
०शहरासाठी किती निधी आणला?
०उद्योगधंद्यांसाठी काय प्रयत्न केले?
०केवळ फोटो छापून विकास होतो का?
०उड्डाणपुलाचे काम कोणामुळे बंद झाले?
०‘त्या’ कर्मचा-यांना कोणी मारहाण केली?
०हॉटेलसमोरील दुभाजक कोणी काढले?
०स्वत:चा प्रभाग टँकरमुक्त का झाला नाही?
०केडगाव पाणी योजना का रखडली ?
०सारसनगरचे नागरिक तक्रार का करतात?

...त्यापेक्षा विकाकामे पूर्ण करा
युतीच्या काळात विकासकामे मार्गी लागली. केडगावची रखडलेली पाणी योजना व शहर पाणी योजनेतील टाक्यांची कामे पूर्ण केली. आंदोलनास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न महापौरांनी करू नये. त्यापेक्षा नियोजन करून कामे पूर्ण करावीत.’’ शीला शिंदे, माजी महापौर

दादागिरीला लोक वैतागले
नगरोत्थानच्या कामासाठी सन 2010 मध्ये आठ कोटींचा निधी मिळाला होता. परंतु शासनाच्या ई-निविदेच्या अटीमुळे जगताप यांनी या कामाची निविदाच काढली नाही. स्वत:च्या मर्जीतील ठेकेदाराला काम देता येणार नाही, अशी भीती त्यांना होती. त्यांच्या दादागिरीला लोक वैतागले आहेत.’’ अनिल शिंदे, नगरसेवक

योग्य नियोजनाचा अभाव
युतीच्या काळात पाण्याची ओरड झाली नाही. तत्कालीन महापौर शिंदे यांनी जायकवाडीला सोडलेले हक्काचे पाणी थांबवण्यासाठी सर्वोच्च् न्यायालयात धाव घेतली. आता मात्र नियोजनाचा अभाव आहे.’’ संभाजी कदम, शिवसेना, शहरप्रमुख