आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांत जनावरांसाठी छावण्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जनावरांना पाणीपुरवठा करण्यासाठी जास्तीच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आठ दिवसांत छावण्या देण्यात येतील. त्यासाठी प्रशासनाने छावण्यांचे प्रस्ताव मागवावेत, असे आदेश पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी दिले.
जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब थोरात, शिवाजी कर्डिले, विजय आैटी, भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड, राहुल जगताप, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सद्यस्थितीत सुमारे साडेपाच लाख लोकसंख्येला ३५५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत ४५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. एप्रिलपासून गोदावरीचे रोटेशन सोडण्याचे नियोजन असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावर विखे यांनी आक्षेप घेत नियोजनातील त्रुटींवर बोट ठेवले. सोडलेले आवर्तन मधमेश्वरपर्यंत पोहोचण्याबाबतच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. यावर पालकमंत्री शिंदे यांनी आवश्यक दक्षता घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. यासंदर्भात नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत २२ मार्चदरम्यान बैठक घेऊन नियोजन करण्याचे ठरले. आमदार कांबळे यांनी श्रीरामपूर तालुक्याचा प्रश्न उपस्थित करून इरिगेशनमुळे टँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रार मांडली. त्यावर पालकमंत्र्यांनी टँकर सुरू करण्याचे आदेश दिले. आमदार कर्डिले म्हणाले, उदभव कोरडे पडल्यानंतर पाणी मिळत नाही. ज्या गावांच्या पाणी योजना आवर्तनावर अवलंबून आहे. त्या योजनांची अडचण झाली आहे. पाटबंधारे विभाग पाणीसाठा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्याचे असल्याचे उत्तर देतात. परंतु, तीन आठवडे होऊनही पाणी वेळेत मिळत नाही. राखीव पाणी सोडायला आंदोलन केले, तरच प्रश्न सुटतो. यावर पालकमंत्र्यांनी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन प्रस्ताव आल्यानंतर पाणी दिले जाईल, असे स्पष्ट केले. कुकडी धरणातील पाणी सोलापूर, पुणे नगर जिल्ह्याला मिळते. परंतु, राखीव साठा जिल्हाधिकाऱ्यांकडे नाही, असे आमदार आैटी यांनी सांगितले. यावर मंत्री शिंदे यांनी तीन जिल्ह्यांचा प्रश्न असल्याने तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. आमदार राजळे यांनी, जनावरांना पाणी आणि चारा देण्यासाठी छावण्या सुरू करण्याची मागणी केली. आमदार थोरात यांनी टँकर मंजुरीची अडचण मांडली. टँकरची मागणी करूनही कागदपत्रांसाठी टँकर सुरू होत नाहीत. टँकर दिल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करावी. त्यानुसार मंत्री शिंदे यांनी गरज असेल, तेथे तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश तहसीलदार गटविकास अधिकाऱ्यांना दिले. ज्या गावात प्रादेशिक पाणी योजना आहेत, परंतु त्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावेत. ज्या ठिकाणी टँकरचे उदभव आहेत, त्या ठिकाणी भारनियमनामुळे विलंब होतो. अशा ठिकाणी जनरेटर बसवण्यात यावेत, यासाठी आमदार निधीतून पाच लाख देण्यास आम्ही तयार आहोत, असे विखे यांनी सांगितले. सर्व मुद्दे ऐकल्यानंतर मंत्री शिंदे यांनी आठ दिवसांत चारा छावण्या सुरू करण्याबाबतचा निर्णय घेता येईल. त्यासाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांकडे छावणीच्या मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. शेतीसाठी गाळउपसा करताना कोणतीही रॉयल्टी घेतली जाणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे शेतकरीवर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

वांबोरीला "पांढरीपूल'चे पाणी द्या : कर्डिले
वांबोरी गावात टंचाई असल्याने पांढरीपूल एमआयडीसीच्या वाहिनीतून एक कनेक्शन मिळावे. त्याचे रितसर बिलही भरण्यास ग्रामपंचायत तयार आहे, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी बैठकीत सांगितले. सोनई पाणी योजनेत उंबरे, ब्राह्मणी, पिंप्री अवघड या गावांचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. हा प्रश्न जलसंपदामंत्र्यांच्या उपस्थितीत सोडवला जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
शनिवारी झालेल्या टंचाई आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री राम शिंदे. समवेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, जिल्हाधिकारी अिनल कवडे, मुख्य कार्यकारी अिधकारी शैलेश नवाल. छाया: उदय जोशी.

विलंब केल्यास निलंबन
आमदार राहुल जगताप यांनी १३० जणांनी जॉबकार्ड भरूनही तहसीलदारांनी काम दिले नाही, असा आरोप केला. यावर पालकमंत्री राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले.

लाभ क्षेत्रातही योजना
दुष्काळी उपाययोजना करताना लाभक्षेत्र भागात (कमांड) दुष्काळी उपाययोजना करताना मर्यादा येतात. परंतु, ज्या भागात तीन वर्षांपासून पाण्याचा लाभ मिळाला नाही त्या ठिकाणचे दाखले पाटबंधारे विभागाने द्यावेत. त्यानंतर उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नगरसाठी नवा उद्भव
नगर तालुक्यातील काही भागात पाणीपुरवठा करताना नगर महापालिकेचा वसंत टेकडी येथील उदभव वापरला जातो. त्यामुळे टँकरला विलंब होत असल्याचे सभापती संदेश कार्ले यांनी सांगितले. त्यावर नगर एमआयडीसीत नवा उदभव सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

खेपांचा मुद्दा गाजला
नियोजित मंजूर खेपांपैकी ११ टक्के खेपा कमी होत असल्याच्या प्रश्नाकडे "दिव्य मराठी'ने शनिवारी लक्ष वेधले होते. त्यावर टंचाईसभेत झालेल्या चर्चेत नियोजित खेपा करण्याचे आदेश देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...