आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नाट्य अभिनेते अनिल क्षीरसागर यांची "एक्झिट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तीफुलराणी, निष्पाप, चित्कार, रायगडाला जेव्हा जाग येते अशा अनेक नाटकांत संस्मरणीय भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते अनिल रघुनाथ क्षीरसागर यांचे गुरूवारी सायंकाळी सव्वापाच वाजता निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. अभियंता नाट्यकर्मी अभिजित क्षीरसागर यांचे ते वडील ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर यांचे व्याही होत. शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी साडेआठ वाजता अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

"बालीकाका' या नावाने नाट्यवर्तुळात परिचित असलेल्या अनिल क्षीरसागर यांनी नगरची हौशी रंगभूमी गाजवली. अभिनयाचे बाळकडू त्यांना वडील रघुनाथराव यांच्याकडूनच मिळाले. एसटी महामंडळाच्या सेवेत असताना त्यांनी एसटीच्या स्पर्धेत अनेक नाटके बसवून बक्षिसे मिळवली. अभिनेते सदाशिव अमरापूरकर, सुधाकर निसळ, मकरंद खेर यांच्या समवेत त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक नवे उपक्रम राबवले.
१९५९ ते ८१ दरम्यान हौशी रंगभूमीवर काम केल्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. मोहन जोशी, भक्ती बर्वे, सविता प्रभुणे आदी कलावंतांसमवेत त्यांनी भूमिका केल्या. "ती फुलराणी'तील त्यांची भूमिका गाजली. काही मराठी िहंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले.

खर्जातील दमदार आवाज आणि उत्तम संवादफेकीमुळे अनिल क्षीरसागर यांचे निवेदन वैशिष्ट्यपूर्ण असे. महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांच्याकडेच असे. अनेक कार्यक्रमात मुख्य वक्त्यापेक्षा त्यांचे निवेदनच लक्षात राहत असे. दीपा निसळ प्रतिष्ठानच्या कामात त्यांचा सहभाग होता. काही वर्षांपूर्वी पॅरॅलिसीस झाल्यामुळेे नाटकात काम करणे त्यांनी थांबवले. अलीकडे ते सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागले होते. मागील काही दिवसांपासून मधुमेह किडनी विकारामुळे त्यांना नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरूवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रंगकर्मींमध्ये शोककळा पसरली.

स्वच्छ मनाचा मेहनती कलावंत
^दीडमहिन्यापूर्वीसदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नगरला घेण्यात आलेल्या एकांकिका स्पर्धेत माझ्या हस्ते बालीकाकांना नाट्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते मला म्हणाले होते, "मोहन, ही तुझी आणि माझी कदाचित शेवटची भेट असावी...' नियतीलाही ते मान्य असावे. "ती फुलराणी' नाटकात आम्ही दोघांनी एकत्र काम केले. मनाने खूप चांगला, स्वच्छ मनाचा आणि मेहनती असा हा कलावंत होता. व्यावसायिक रंगभूमीवर आल्यानंतर रात्री मंुबईत नाटकाचा प्रयोग करून सकाळी तो एसटी महामंडळाच्या कार्यालयात हजर असायचा.'' मोहन जोशी, अध्यक्ष,अ. भा. मराठी नाट्य परिषद.