आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anjali Damania News In Marathi, AAP, Lok Sabha Election, Shirdi Lok Sabha Constituncy

सर्वसामान्य लोकांनी राजकारणात उतरावे,अंजली दमानिया यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - देशामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य लोक घाणेरड्या राजकारणामुळे ओरबाडले जात आहेत. हे बदलायचे असेल, तर सर्वसामान्य लोकांचे, साधेपणाचे राजकारण देशात आले पाहिजे. त्यासाठी सामान्य लोकांनी राजकारण हातात घ्यायला हवे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाच्या राज्य समन्वयक अंजली दमानिया यांनी केले.


शिर्डी लोकसभेचे उमेदवार नितीन उदमले यांच्या प्रचारार्थ शनिवारी शहरात आयोजित सभेत दमानिया बोलत होत्या. यावेळी जिल्हा समन्वयक राजू आघाव, शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे, सरवरअली सय्यद आदी उपस्थित होते.


दमानिया म्हणाल्या, कॉँग्रेस व भाजपने देशातील सर्वसामान्य लोकांना दगा दिला आहे. त्यांनी आतापर्यंत देशातील जनतेला धर्म व जातीचे राजकारण करून एकमेकांसोबत लढवले. घराणेशाहीचे राजकारण केले. आम आदमी पक्ष मात्र जातीचे राजकारण करीत नाही. दोन ओपनच्या जागेवर अनुसूचित जातीच्या माणसांना उमेदवारी देऊन पक्षाने ते सिद्ध केले आहे.


देशातील राजकारणच बदलण्यासाठी आम आदमी पक्ष राजकारणात आला आहे. निवडणुकीनंतर सामान्य माणसांना विसरणार्‍या नेत्यांनाच सामान्य माणूस बनवायचे आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लाट ही जशी आली तशीच परत जाणार आहे. गुजरातचा विकास झाल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. गुजरातमधील शेतकरी सर्वात दयनिय परिस्थितीत जीवन कंठत आहे. अंबानी, अदाणी यांसारखे उद्योजकांचा मात्र प्रचंड विकास झाला आहे. तिथे शाळा, शिक्षक, दवाखाने, औषधे यांची कमतरता आहे. दीड वर्षात पन्नास लाख घरे बांधून देण्याचे आश्वासन देणार्‍या मोदींनी पन्नास घरेही बांधली नाहीत. याबाबत माध्यमे मात्र मोदींना काही विचारत नाहीत. केजरीवालांना मात्र विचारतात हे कसे, असा सवाल त्यांनी केला. कॉँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. ते काही धोरण पटले नाही म्हणून गेले नाहीत. जो तिकीट देईल त्यांच्या मागे जायचे असे त्यांचे धोरण आहे. सदाशिव लोखंडे यांनीही तिकिटासाठी तीन ठिकाणी उड्या मारल्या. त्यामुळे या दोघांचं धोरणाचं नाही तर सोयीचं राजकारण असल्याची टीका दमानिया यांनी केली. सुशिक्षीत, सर्वसामान्य लोक जोपर्यंत राजकारणात येणार नाहीत तोपर्यंत देशातील घाणेरडं राजकारण बदलणार नाही, मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या संस्था बंद पडल्यामुळे बेकार झालेल्या 1600 कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, आघाव, सय्यद, पटारे यांची भाषणे झाली.


तरुणांना नोकर्‍या देऊ..
सर्वसामान्य लोकांच्या हातात सत्ता असावी यासाठी पक्ष काम करीत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे वाडा संस्कृतीच्या राजकारणाचा शेवट झाला असे वाटले होते. मात्र लोकप्रतिनिधी त्यांच्याच टीममध्ये सामिल झाले. खासदारांनी खासदार निधीतून पंधरा टक्के निधी दलित वस्तीवर खर्च करायला हवा, मात्र स्वत: दलित असलेल्या खासदारांना याबाबतीत प्रश्‍न विचारला असता ते उत्तर देऊ शकले नाहीत. मुलभूत सुविधांचा प्रश्‍न बिकट झाला असून निवडून आल्यावर 25 हजार तरुणांना नोकर्‍या देऊ, असे आश्वासन उदमले यांनी दिले.