आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर व कर्जत-जामखेडची जागा राष्ट्रवादीकडे द्या : अंकुश काकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांकडून आम्ही अहवाल मागवले. त्यानुसार नगर शहर व कर्जत-जामखेडमध्ये आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा राष्ट्रवादीला मिळायला हव्यात. विधानसभेच्या उमेदवारांची यादी दोन दिवसांत जाहीर होईल, असे राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले.

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या २१ सप्टेंबरला निवडी होणार आहेत. यापार्श्वभूमीवर काकडे नगर दौऱ्यावर आले होते. त्यांनी राष्ट्रवादी भवनात कार्यकर्ते व जि. प. सदस्यांची बैठक घेतली. नंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, महापौर संग्राम जगताप, सरचिटणीस सोमनाथ धूत आदी उपस्थित होते.

काकडे म्हणाले, राहुरीसह इतर जागा राष्ट्रवादीकडेच राहतील. त्यात कोणताही अदलाबदल होणार नाही. ज्या ठिकाणी काँग्रेसने जागा गमावल्या आहेत, तेथे आमची ताकद आहे. राजीव राजळे आजही पक्षात असून मोनिका यांनीही आम्ही येथेच असल्याचे सांगितले. राजळे अजून नैराश्यातून बाहेर पडलेले नाहीत.

जिल्हा परिषदेत अडीच वर्षांपूर्वी आम्हाला काँग्रेसबरोबर आघाडी करायची होती, पण जागावाटपावरून बिघाडी झाल्याने भाजप व शिवसेनेला बरोबर घेतले. या आघाड्या तोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीगोंदे पंचायत समितीत राष्ट्रवादीचाच सभापती निवडून आला आहे. पक्षाची गटनोंदणी झाली असून आम्ही जिल्हाध्यक्षांना सर्व अधिकार दिले आहेत. सदस्यांची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असे ते म्हणाले.

प्रतिभा पाचपुतेंचा राजीनामा नाही
जि. प. पदाधिकारी निवड हात वर करून केल्या जातात. पक्ष सदस्यांची यापूर्वीच गटनोंदणी झाली आहे. कोणी उघडपणे पक्षाविरोधी मतदान केले, तर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली जाईल. प्रतिभा पाचपुते आमच्या पक्षात आहेत. त्यांनी अजून राजीनामा दिलेला नाही, असे काकडे म्हणाले.