नगर - बुलडाणा जिल्हा परिषदेतील अपक्ष सदस्य बाळासाहेब दराडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अण्णांनी म्हटले आहे की, दराडे हे सामाजिक जाणीव, राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी अमेरिकेतील आरामदायी जीवन सोडून समाजसेवेचे कार्य हाती घेतले आहे. अशा चारित्र्यवान, सुशिक्षित उमेदवाराला माझा सक्रिय पाठिंबा आहे. जनतेने शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक, त्याग व चारित्र्यशील उमेदवार जर अपक्ष म्हणून उभे केल्यास त्याला मी पाठिंबा देईन व प्रचारही करेन. आज सर्वच पक्ष तंत्र, पार्टी तंत्र, अधिकारी तंत्र, पुढारी तंत्र आले आहे. लोकतंत्र किंवा लोकशाही देशात आलीच नाही. 90 वर्षांत लाखो लोकांनी जे बलिदान दिले ते व्यर्थ गेले का? ते बलिदान व्यर्थ होऊ नये. यासाठी आता युवा शक्तीने पुढे येणे आवश्यक आहे. देशात लोकशाही किंवा लोकतंत्र हे पक्षतंत्र किंवा पार्टीतंत्र करून होणार नाही. जनतेने आपला चारित्र्यशील उमेदवार निवडून पाठवल्याशिवाय लोकशाही येऊ शकणार नाही. म्हणूनच मतदारांनी
कोणताही पक्ष न पाहता चारित्र्यशील उमेदवारालाच संसदेत पाठवणे हा एकच पर्याय आहे, असेही अण्णांनी म्हटले आहे. दरम्यान, दराडे यांनी आम्ही एक नवीन जनतंत्र निर्माण करू ज्यात गोरगरिबांचा विचार होईल. भ्रष्टाचारमुक्ती कशी करता येईल याबाबत 17 मुद्दे असलेले प्रतिज्ञापत्र अण्णांकडे सादर केले आहे.
‘नासा’ ते जिल्हा परिषद
दराडे हे पांग्रा डोळे सर्कलमधून निवडून आलेले आहेत. नासाने 2002 मध्ये मंगळावर सोडलेल्या मार्स रोव्हर यानाशी संबंधित प्रोजेक्टमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे. समाजकार्याच्या उद्देशाने नासाची नोकरी सोडून आलेल्या दराडे यांनी जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्ये केली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, ई- लर्निंग प्रोजेक्ट, आदिवासी गावे दत्तक घेणे आदी कामे त्यांनी केली आहेत.