आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सक्षम जनलोकपालसाठी ऑक्टोबरपासून अण्णा हजारे यांचे आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - दोन वर्षे उलटूनही सक्षम जनलोकपाल बिल संमत न झाल्याने सरकारने देशातील 120 कोटी जनतेला धोका दिल्याचा आरोप करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सक्षम जनलोकपालाच्या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात आंदोलन करण्याची घोषणा केली. हजारे यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना तसे पत्र पाठवले असून शरीरात प्राण असेपर्यंत रामलीला मैदानावर या मागणीसाठी उपोषण करणार असल्याचे या पत्रात म्हटले आह़े

सक्षम जनलोकपालाच्या मागणीसाठी हजारे यांनी रामलीला मैदानावर ऑगस्ट 2011 मध्ये केलेल्या आंदोलनादरम्यान तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्या वेळी देण्यात आलेल्या पत्रात सिटिझन चार्टर, प्रत्येक राज्यात सशक्त लोकायुक्त तसेच वर्ग अ ते ड मधील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना लोकपालाच्या कक्षेत आणण्यासंदर्भात संसदेत प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले होत़े. इतर मुद्दय़ांवर चर्चा करण्याचे मान्य करण्यात आल्याची आठवण करून देत हजारे यांनी पत्रात म्हटले की, उपोषण मागे घेतेवेळी देण्यात आलेल्या आश्वासनावर मी विश्वास ठेवला होता. हा विश्वास ठेवताना समाज व देशाचे भले पाहिले होत़े.

मला दु:ख होत आहे की, 16 ऑगस्ट 2011 रोजी जेव्हा मी रामलीला मैदानावर उपोषणास बसलो होतो त्या वेळी संपूर्ण देशातील जनता करोडोंच्या संख्येने जनलोकपालाची मागणी करीत रस्त्यावर उतरली होती़. 12 दिवस देशभर आंदोलन सुरू होत़े सरकारच्या आश्वासनानंतर दोन वर्षे उलटत आली तरीही संसदेत संमत झालेल्या प्रस्तावाची आठवण करुन देण्याचा देण्यात आलेला सल्ला म्हणजे आपल्या कर्तव्याची पूर्तता आहे काय, असा सवाल हजारे यांनी केला.

या आंदोलनाप्रसंगी ज्या वेळी देशातील करोडो लोक रस्त्यावर उतरले त्या वेळी सरकार संकटात आल्याची शंका निर्माण झाली होती़ त्यामुळेच माझे उपोषण समाप्त करून जनतेला धोका तर दिला नाही ना? कारण संसदेत बसलेले सर्व आपले वेतन, रेल्वे, विमान, निवास सुविधा वाढवण्यासाठीची बिले सर्वसंमतीने एक दिवसात मंजूर करतात; परंतु समाज आणि देशाच्या हितासाठी भ्रष्टाचाराला आळा घालणारे जनलोकपालासारखे बिल दोन वर्षांपर्यंत मंजूर होऊ शकत नाही़ राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीप्रसंगी विरोध होऊनही सरकार बहुमत प्राप्त करू शकते. एफडीआयला विरोध होऊनही बहुमत प्राप्त होत़े भ्रष्टाचाराला आळा घालणार्‍या जनलोकपाल कायद्यासाठीही बहुमत प्राप्त करणे अशक्य नव्हत़े सरकारने जनतेला धोका दिला आहे. खोटे आश्वासन देण्यात येऊन माझे उपोषण सोडवण्यात आले होत़े ते अधुरे उपोषण रामलीला मैदानावर ऑक्टोबर महिन्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आह़े त्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अण्णांनी आपल्या पत्रात नमूद केले.

पाच राज्यांत जनजागृती करणार
पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील 11 जिल्हे तसेच उत्तराखंडच्या सर्व जिल्ह्यांचा आपण दौरा केला असून जनलोकपालासाठी पुन्हा करणार्‍या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचेही हजारे यांनी म्हटले आह़े सध्या आपली जनतंत्र यात्रा सुरू असून आणखी पाच राज्यांत जनतेची जागृती करणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरमधील उपोषणाची तारीख घोषित केली जाईल, असेही हजारे यांनी पत्रात नमूद केले.