पारनेर- गावाला केंद्रस्थानी ठेवून विकासाची अर्थनीती बदलू शकते, हा विचार ममता बॅनर्जी करत असल्याने त्यांच्या पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सांगितले. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस खासदार मुकुल रॉय, खासदार के. डी़. सिंग यांच्यासह दोन सहकार्यांनी गुरुवारी राळेगणसिद्घी येथे अण्णांची भेट घेऊन चर्चा केली.
सुमारे एक तास बंद खोलीत चर्चा झाली. ‘तिसरी दुनिया’ साप्ताहिकाचे संपादक संतोष भारती त्यांच्यासमवेत होते. चर्चेदरम्यान हजारे यांनी ममता यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. 18 फेब्रुवारीला दिल्लीत ममता व हजारे यांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील नीती ठरवण्यात येईल. प्रचाराचेही नियोजन या वेळी करण्यात येणार आहे.
असल्याचे अण्णांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी सांगितले.अण्णा म्हणाले, आम्ही सर्व पक्षांकडे 17 मुद्दे पाठवले होते. केवळ ममता बॅनर्जी यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सत्तेवर आल्यास अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शवली. तसे प्रतिज्ञापत्रही देण्याचे मान्य केले.तसेच देशाच्या हितासाठी सांगाल त्याची अंमलबजावणी करू, असा निरोप पाठवला.
निवडणुका जवळ आल्याने पक्षांचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. सभांवर कोट्यवधींचा खर्च करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होत आहे. काही पक्षांनी तीस शहरांत मोफत चहाचे स्टॉल्स सुरू केले आहेत. कोणी मोफत लॅपटॉप देत आहे. हे सर्व सत्तेसाठी सुरू आहे. मात्र, सत्ता बदलून परिणाम होणार नाही, तर व्यवस्था बदलली पाहिजे. समाजासाठी लढताना ममता बॅनर्जी यांच्या डोक्यात 66 टाके पडले आहेत. त्यांचे काम पाहता त्या पंतप्रधान झाल्यास 66 वर्षांत जे झाले नाही, ते पाच वर्षांत पाहावयास मिळेल, असा विश्वासही अण्णांनी व्यक्त केला.
प्रथमच एखाद्या पक्षाला पाठिंबा
गोवा, त्रिपुरा, तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांकडे देशहिताचे विचार आहेत. त्यांच्यामध्ये ममता बॅनर्जी ज्येष्ठ असून त्यांच्या कार्यातून मला आशेचा किरण दिसत आहे. साधी राहणी असलेल्या ममता 10 बाय 12 च्या खोलीत राहतात. शासकीय वाहन, बंगला तसेच इतर सुविधा घेत नाहीत. जनता अशांच्या पाठीशी उभी राहिली, तर देश बदलण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे पहिल्यांदाच आपण एखाद्या पक्षाला पाठिंबा देत आहोत. घटना पक्षाचे नाव घेत नाही, तर लोकतांत्रिक गणराज्याचा पुरस्कार करते. लोकांनी आपला स्वतंत्र वा चारित्र्यशील प्रतिनिधी संसदेत पाठवावा, असे हजारे यांनी सांगितले.