Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | anna hajare said to ralegan siddi village people

राळेगणच्या तरुणांचा स्वाभिमान वाखाणण्याजोगा : अण्णा हजारे

प्रतिनिधी | Update - Oct 20, 2011, 01:16 AM IST

राहुल गांधी यांना परत न भेटण्याचा व राळेगणसिद्धीत न बोलावण्याचा निर्णय सरपंच जयसिंग मापारी व त्यांच्या सहका-यांनी घेतल्याचे आपल्याला सांगितले.

 • anna hajare said to ralegan siddi village people

  नगर: राहुल गांधी यांना परत न भेटण्याचा व राळेगणसिद्धीत न बोलावण्याचा निर्णय सरपंच जयसिंग मापारी व त्यांच्या सहका-यांनी घेतल्याचे आपल्याला सांगितले. राळेगणच्या तरुणांना हा स्वाभिमान वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी व्यक्त केली.
  मापारी व त्यांच्या सहका-यांना राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत पाचारण करण्यात आले होते. काँग्रेसचे खासदार पी. टी. थॉमस यांच्या पुढाकाराने ही भेट आयोजित झाल्याचा दावा मापारी यांनी केला असून, थॉमस यांनी मात्र भेट ठरलीच नव्हती, असे म्हटले आहे. त्यामुळे राहुल यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेलेल्या मापारी व राळेगणच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला राहुल यांची भेट न घेताच परतावे लागले.
  त्या पार्श्वभूमीवर हजारे यांनी बुधवारी रात्री आपली भूमिका विशद केली आहे. पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की रामलीला मैदानावर आपले उपोषण सुरू असताना काँग्रेसचे खासदार पी. टी. थॉमस हे राळेगणला आले होते. गावातील विकासकामे पाहून ते प्रभावित झाले. आपण राहुल गांधी यांना राळेगणसिद्धीतील विकासकामांबाबत सांगणार असून, आपणही त्यांच्याशी चर्चा करा, असे त्यांनी सरपंच मापारी यांना सांगितले होते. गेल्या आठवड्यात सरपंच मापारी व सहकाºयांनी राहुल गांधी यांच्याशी विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आम्हाला थॉमस यांनी दिल्लीला बोलावल्याचे सांगितले. त्यावर आपण त्यांना विकासकामांसाठी चर्चा असेल, तर जरूर जा, असे सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांना राहुल व थॉमस यांच्याकडून काहीही मागायचे नव्हते. देश महासत्ता होण्यासाठी राळेगणसारखे काम इतरत्र व्हायला हवे, हा त्यांच्या भेटीमागचा उद्देश् होता. तथापि, राहुल यांची भेट न घेताच सरपंच व त्यांचे सहकारी परतल्याचे आपल्याला टीव्ही पाहताना समजले.
  गेली 30 वर्षे राळेगणमध्ये आम्ही कोणाही नेत्याला बोलावत नाही. पुष्पहार घालीत नाहीत. जे येतात त्यांचे चहापानी देऊन स्वागत करतो. अतिथी देवो भव ही आमची परंपरा आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा राहुल यांची भेट घ्यायची नाही व त्यांना गावात बोलवायचेही नाही, हा सरपंच व तरुणांना निर्णय स्वाभिमानी वृत्तीचे दर्शन घडविणारा असून, तो आपल्याला भावला आहे, असे हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे.
  आता काय करायचे ते अण्णाच ठरवणार
  राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांशी खासदार राहुल गांधी यांच्या भेटीबाबत घडलेल्या प्रकाराबाबत आता काय करायचे ते अण्णा हजारेच ठरवतील, अशी प्रतिक्रिया राळेगणचे सरपंच जयसिंग मापारी यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. ते म्हणाले, की माझ्यासह हजारे यांचे स्वीय सहायक सुरेश पठारे व इतर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळ राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार पी. टी. थॉमस यांनी त्यासाठी मध्यस्थी केली होती. तथापि, ही भेट होवू न शकल्याने मंगळवारी रात्री उशीरा आम्ही राळेगणला पोहोचलो. त्याबाबत आमची काहीच प्रतिक्रिया नसून, आता अण्णा हजारे हेच त्याबाबतचा निर्णय घेतील.
  दिवाळीनिमित्त गावाला भेट
  दिवाळीनिमित्त गावातील 384 घरांसमोर लावण्यासाठी नारळाची झाडे देण्यात येणार असल्याचे मापारी यांनी सांगितले. ही झाडे आंध्र प्रदेशातून आणण्यात आली असून, त्याची उंची सुमारे पाच फूट असेल, असेही ते म्हणाले. अण्णा हजारे यांच्या हस्ते गावात या झाडांचे वाटप करण्यात येणार आहे.
  झेड सुरक्षेला नकारच
  राज्याचे पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. सत्यपाल सिंह यांनी बुधवारी राळेगणला येऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी झेड दर्जाची सुरक्षा घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली. अण्णांच्या जीविताला धोका असल्याचा अहवाल मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सत्यपाल सिंंह यांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात आले. तथापि, अण्णा हजारे यांनी मात्र झेड सुरक्षा घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचे सांगण्यात आले.

Trending