आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी काळात शेतकर्‍यांसाठी जनआंदोलन : अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जमीन आणि शेतीच्या पाण्याचा विचार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेत बदल होणे आवश्यक असल्याचे सांगतानाच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी आगामी काळात राष्ट्रीय स्तरावर जनआंदोलन उभारण्याचा मनोदय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी राळेगणसिद्धीत व्यक्त केला.

राळेगणसिद्धी ग्रामपंचायत व जैन इरिगेशन सिस्टिमच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उच्च कृषी तंत्र परिषदेचे उद्घाटन हजारे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निसर्गकवी ना. धों. महानोर होते.

मोठय़ा कारखान्यांमुळे निसर्ग व मानवतेचे शोषण होत आहे. हे शोषण थांबवून जमीन व पाण्याचे योग्य नियोजन होणे आवश्यक असल्याचे सांगत हजारे म्हणाले, शेतकर्‍यांना त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाच्या खर्चावर आधारित बाजारभाव मिळत नाही. शेतकर्‍यांनी संघटितपणे आपल्या हक्कांसाठी लढा देण्याची गरज आहे. देशातील जनतेच्या हितासाठी वेगवेगळे कायदे व्हावे यासाठी आपले आंदोलन सुरू आहे. यानंतर शेतकर्‍यांच्या प्रo्नांविषयी आंदोलन करणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.

महानोर म्हणाले, शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड द्यावी. दर वाढल्याने शेती परवडत नाही. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन देणार्‍या पिकांचे संशोधन होणे गरजेचे आहे.

माती वाहून जाऊ न देण्यासाठी प्रयत्न करावे
गावातील माती धरणात वाहून जात असल्याने धरणे गाळाने भरली आहेत. त्यामुळे भविष्यात धरणेच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळाची दृष्टी केवळ पाच वर्षांसाठीच असल्याने तेही याचा विचार करीत नाही. त्यामुळे गावातील माती वाहून जाऊ न देण्यासाठी गावकर्‍यांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’ अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

राळेगणसिद्धी येथे आयोजित उच्च कृषी तंत्र परिषदेचे उद्घाटन करताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे. समवेत कवी ना. धों. महानोर, अशोक जैन, डॉ. सुधीर भोंगळे, विश्वासराव पाटील, के. बी. पाटील. छाया : देविदास आबूज.