आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... तोपर्यंत भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र होणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आजच्या युगात आधुनिकीकरणात युवक भरकटले जात आहेत. युवकांनी वेळीच जबाबदारी घेऊन नवीन कलाकौशल्ये अवगत केली पाहिजे. आजचे काम आजच करून नवीन दिशा ठरवली पाहिजे. भारतात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. शासकीय योजना लाभार्थींपर्यंत पोहोचत नसून भ्रष्ट राजकारणी व भ्रष्ट अधिकारी त्याचा फायदा घेत आहेत. जोपर्यंत तरुण याविरोधात आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र होणार नाही, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

स्नेहालय संस्थेत आयोजित 14 व्या युवा प्रेरणा शिबिराच्या निमित्त लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुतळ्याचे अनावरण अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. लोकमान्य टिळक यांनी 1914 मध्ये ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ ही घोषणा केली होती. या घोषणेला रविवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. लोकमान्य टिळकांची नातसून मुक्ता टिळक, अविनाश धर्माधिकारी, अर्शद शेख, डॉ. स्मिता कोतकर व देवदत्त कोतकर, सुवालाल शिंगवी या वेळी उपस्थित होते.

भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लोकमान्य टिळकांनी जिवाचे रान करून आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. अडचणींवर मात करून त्यांनी देशभर ‘होमरूल चळवळ’ राबवून यशस्वी केली, असे मुक्ता टिळक यांनी सांगितले. अर्शद शेख यांनी जातीपातीवर होणारे अन्यायकारक राजकारण याबाबत युवकांचा दृष्टिकोन बदलण्याकरिता सक्षमीकरणाची गरज आहे, असे सांगितले.

स्नेहालय दरवर्षी युवकांना समाजातील सामाजिक ज्वलंत प्रश्न व समस्यांबाबत जागरूक करण्यासाठी युवा प्रेरणा शिबिर राबवते. यावर्षीच्या चौदाव्या युवा प्रेरणा शिबिरात एक हजारपेक्षा अधिक युवकांनी नावे नोंदवली होती. त्यापैकी 250 युवकांना सहभागी करून प्रवेश देण्यात आले, असे युवा प्रेरणा शिबिराचे समन्वयक नितीन वावरे यांनी सांगितले. सूत्रसंचालन संजय बंदिष्टी यांनी केले. तर आभार संजय गुगळे यांनी मानले.
तरुणांनी ध्येय निश्चित करावे
जीवनात स्वातंत्र्याची मूल्ये जोपासण्यासाठी तसेच समाजातील अंधारमय जीवन उज्ज्वल करण्यासाठी तरुणांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. समाजातील भ्रष्ट जातीपाती व न्याय व्यवस्थेविरुद्ध आवाज उंचावण्याची गरज आहे. तसेच समाजातील एकोपा जोपासण्याकरिता संघटितपणे लढा देणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी यांनी केले.
युवकांचा उदंड प्रतिसाद
या शिबिरात सामूहिक श्रमदान, करिअर मार्गदर्शन, गटचर्चा, योगवर्ग, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रेरणा गीते, हे उपक्रम झाले. अनेकांना आयुष्यात समाजासाठी वेगळे काही करण्याची इच्छा असते. अशांना योग्य मार्गदर्शन, तरुणांमध्ये स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा पेरून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात त्यांचा सहभाग वाढवणे, हा या शिबिराच्या आयोजनामागील मुख्य हेतू होता.
फोटो - स्नेहालय संस्थेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुतळ्याचे अनावरण अण्णा हजारे यांच्या हस्ते झाले. या वेळी मुक्ता टिळक, अविनाश धर्माधिकारी, अर्शद शेख, देवदत्त कोतकर उपास्थित होते.