आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी रामलीलावर; अन् जनता रस्त्यावर उतरेल'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- देशभर दीड वर्ष दौरा केल्यानंतर किमान सहा कोटी जनतेचे संघटन करण्यात निश्चित यश मिळेल. निवडणुका जाहीर झाल्यानंतर राईट टू रिजेक्ट, जनलोकपाल व दप्तर दिरंगाई कायद्यासाठी मी रामलीला मैदानावर आणि जनता तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

न्यू लॉ कॉलेज येथे आयोजित ‘युवकांची राष्ट्र बांधणीत भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात अण्णा बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, प्राचार्य ए. एस. राजू, विश्वस्त सीताराम खिलारी, शाहीर गायकवाड, बाबा गायकवाड आदी उपस्थित होते. हजारे म्हणाले, युवक माझे आशास्थान आहेत. राखेच्या ढिगार्‍यातून तरुणांनी जपान उभा केला. त्यामुळे मला खात्री आहे की, युवक जागा झाला, तर उद्याचे उज्ज्वल भविष्य दूर नाही. रामलीला मैदानात करोडो तरुण रस्त्यावर आले, आम्ही एकमेकांना पाहिलेही नव्हते, पण सर्वांनीच टोपी घालून ‘मै भी अण्णा ..तू भी अण्णा’ अशा घोषणा दिल्या. मन चंचल आहे ते कधीही धोका देऊ शकते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण पळतोय पण हे कशासाठी, अगदी चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत ही पळापळ सुरू असते. याचा विचार करत असताना मी स्वामी विवेकानंदांचे पुस्तक वाचले अन् मला कळलं की राष्ट्र हे मंदिर असून जनतेची पूजा हीच ईश्वर सेवा आहे. राष्ट्र उभारणीत विकासाला गती देणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार व काळा पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जनता ही मालक असून आपल्यातील प्रतिनिधी आपण संसदेत पाठवले. पण मालक झोपल्याने आता चोर्‍या होऊ लागल्या आहेत.

संसदेत गुन्हे करणारे 163 जण बसले आहेत. याला आळा घातल्याशिवाय भ्रष्टाचार थांबणार नाही. देशभर दीड वर्षाचा दौरा झाल्यानंतर सर्वच जागे होणार नाहीत, पण किमान सहा कोटी जनतेचं संघटन करण्यात निश्चित यश मिळेल. दप्तर दिरंगाई राईट टू रिजेक्ट व लोकपालसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर मी रामलीला मैदानात आंदोलनासाठी उतरणार अन् तुम्ही सर्वजण हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरा. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, आपल्याला धरणांमध्ये होणारे गाळाचे संचयन थांबवावे लागेल. आताच याकडे लक्ष दिले नाही, तर धरणांचेही मरण अटळ आहे, असे हजारे यांनी सांगितले. झावरे म्हणाले, मला एकाने काळ्या पैशाबद्दल सांगितले की, आमदार व खासदार जे पैसे खातात तो काळा पैसा आहे. त्यावेळी मी मनातच म्हणालो, बरे झाले मी आमदार नाही. आता शिक्षण हक्क कायदा झाला पण राईट टू एम्प्लॉयमेंट (नोकरीचा हक्क) कायद्यासाठी अण्णांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती झावरे यांनी केली.