आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंधारणातील भ्रष्टाचारामुळेच राज्यात दुष्काळ; अण्णा हजारे यांची टीका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- निसर्गाने गरजेपुरते पाणी दिले आहे. मात्र, त्याचा योग्य प्रकारे उपयोग न केल्याने दुष्काळ जाणवतो आहे. दुष्काळ निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. नालाबंदिस्ती, सिमेंट बंधारे यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने पाण्याऐवजी पैसा अडवण्याच्या कामावरच जास्त भर दिला गेला, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांना जलसंधारणाची शास्त्रशुद्घ कामे कशी करावीत, याचे प्रशिक्षण देऊन दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी दीर्घकालीन योजना राबवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

पुरेसे सिमेंट न वापरल्यामुळे हजारो बंधारे फुटले आहेत़ यासंदर्भात आपल्याकडे कागदपत्रे असून ती आपण शासनास देण्यास तयार आहोत़ यापूर्वीही आपण ती शासनाकडे दिली होती. मात्र, भ्रष्ट लोकांना निलंबित करून त्यांना पुन्हा हजर करून घेण्यात आल़े लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी संगनमताने या कामांकडे दुर्लक्ष केल्याने दुष्काळी स्थिती ओढवल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आह़े

आज खेड्यांमध्ये सहाशे-सातशे फुटांपर्यंत बोअरवेल घेण्यात येत आहेत. त्याविरोधात सरकारने कठोर कायदा करण्याची गरज आह़े काही ठिकाणी धरणांमधून पाणी सोडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरू आह़े मात्र, प्रत्येक धरणामध्ये हजारो टन माती साचत आहे. कुरण विकासाकडे लक्ष नसल्याने गावातून वाहून जाणारी माती धरणामध्ये जाऊन साचते. ही धरणे गाळाने भरणार आहेत. प्रत्येक गावातील पाणी व माती गावातच कशी राहील याचा विचार होणे गरजेचे आह़े, असे पत्रकात म्हटले आहे.

कागदोपत्री कामाने नुकसान
पावसाचे पाणी वाहून जाऊ नये, यासाठी पाझर तलाव, नालाबंदिस्ती, शेततळे, सिमेंट बंधारे, सीसीटी, वनीकरण, कुरण विकास आदी पद्घतीने पाणी भूगर्भात जिरवणे आवश्यक आहे. तथापि, राज्यात हजारो नालाबंदिस्ती अशा आहेत की जेथे केवळ कागदोपत्री गॉर्ज खोदला गेला. कामावर झालेल्या खर्चाच्या पंधरा टक्के रक्कम बोगस रेकॉर्ड करून काढण्यात आली व ती आपसात वाटून घेण्यात आली़ भ्रष्टाचारामुळे तांत्रिक दोष राहिले. पाणी नाल्याखालून निघून जाते. त्यामुळेच पाण्याची पातळी वाढवण्यात यश आले नाही, असे अण्णा हजारे म्हणाले.