आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare News In Marathi, Medha Patkar, Raju Shetty, Aam Aadami Party

पाटकर, शेट्टी, खोत यांना अण्‍णा हजारेंचा पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना मतदार स्वीकारतील, असा विश्वास व्यक्त करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आम आदमी पक्षाच्या दक्षिण मध्य मुंबईच्या उमेदवार मेधा पाटकर, महायुतीचे हातकणंगलेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी व माढय़ाचे उमेदवार सदाभाऊ खोत यांना एका पत्रकाद्वारे पाठिंबा जाहीर केला़


हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे की, सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीनिमित्त बहुतांश प्रस्थापित नेते आणि राजकीय नेते केवळ राजकीय स्वार्थासाठी भावनिक मुद्यांचे राजकारण करीत आहेत. या पार्श्वभूमिवर शेतकरी, कष्टकरी, र्शमिक, दलित, आदिवासी, महिला, बेरोजगार युवक यांच्या जगण्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांवर काही मोजकेच उमेदवार चर्चा करीत आहेत़ लोकांसमोर मांडत आहेत़ या मोजक्या उमेदवारांमध्ये मेधा पाटकर, शेट्टी, खोत यांचा समावेश आहे. पाटकर, शेट्टी व खोत यांच्यासारखे काही सामाजिक कार्यकर्ते तळागाळातील जनतेच्या न्याय हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी गेली अनेक वर्षे जनआंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहेत. हे काम करीत असताना ते विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. समाज त्यांना नक्कीच पाठबळ देईल. या पुढील काळात या उमेदवारांनी सत्यागृह, जनआंदोलनाच्या माध्यमातून सुरू चळवळ अधिक जोमात चालू ठेवावी. मतदारांनी उमेदवारांच्या पक्षाचा, घोषणांचा, चिन्हांचा विचार न करता समाजासाठी आपले आयुष्य वेचत आलेल्या, अशा चारित्र्यवान उमेदवारांना मतदान करावे. कोणताच उमेदवार पात्र वाटत नसेल, तर ना पसंतीचे मत नोंदवावे, असे आवाहन हजारे यांनी पत्रकात केले.


50 उमेदवारांचे साकडे
लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून राज्यातील विविध पक्षांच्या सुमारे 50 उमेदवारांनी हजारे यांची भेट घेऊन पाठिंब्याचा आग्रह धरला. मात्र, हजारे बधले नाहीत. नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजीव राजळे व खासदार दिलीप गांधी यांनीही हजारे यांची भेट घेऊन याची छायाचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केली व हजारे यांचा आपणास पाठिंबा असल्याचे भासवल्याचा प्रयत्न केला, अशा प्रयत्नांबद्दल हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.