आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare 'threatened' For Taking On NCP Candidate

अण्णा समर्थकांना फोनद्वारे धमकी; उस्मानाबादेत पत्रके वाटणे बंद करा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - ‘उस्मानाबाद जिल्ह्यात पत्रके वाटणे बंद करा... पद्मसिंह पाटील पराभूत झाले, तर परिणाम वाईट होतील. अण्णा व त्यांच्या सहकार्‍यांना पाहून घेऊ...,’ अशी धमकी मोबाइलवरून भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या कार्यालयाला देण्यात आली. याप्रकरणी पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनआंदोलनाचे स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, एका मोबाइलवरून 9 एप्रिलला कार्यालयात फोन आला. पद्मसिंह पाटील यांचे समर्थन करीत अज्ञात व्यक्तीने अण्णा हजारे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर 14 एप्रिलला पुन्हा फोन आला. त्यात पुन्हा हजारे यांना शिवीगाळ करण्यात आली.

पत्रके वाटल्याने धमकी
लोकसभेत भ्रष्ट व कलंकित लोक जाऊ नयेत, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे जनजागृती करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्या भ्रष्टाचार व गैरकारभाराबाबत उस्मानाबादच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या परवानगीने हजारे यांनी पत्रक प्रसिद्घ केले आहे. हे पत्रक हजारे यांचे कार्यकर्ते उस्मानाबाद मतदारसंघात वाटत आहेत. हजारे यांच्या तक्रारीवरून शासनाने न्यायमूूर्ती पी. बी. सावंत आयोगाची स्थापना करून केलेल्या चौकशीत पद्मसिंह पाटील दोषी आढळले. त्याचा राग मनात धरून हजारे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. त्याचा संदर्भही या फिर्यादीत देण्यात आला आहे.