आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय सेवेत जाण्याची खरी प्रेरणा अण्णा हजारे यांची...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोक काय बोलतात याकडे लक्ष देण्याऐवजी स्वत:चे मन काय सांगते याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. जितकी प्रतिकूलता अधिक, तितकी यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढते, असे सांगताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून प्रेरणा घेऊन मी आयएएस व्हायचे ठरवले, असे यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या वरुण बरनवाल याने सांगितले. युवान संचलित स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित ‘सायकल दुरुस्ती ते आयएएस’ या त्याच्या जीवनप्रवासावर वरुण बोलत होता. दहावीला असतानाच पितृछत्र हरवल्याने आईबरोबर सायकल दुरुस्तीचे दुकान सांभाळण्याची जबाबदारी वरुणवर आली. दुकान व अभ्यास अशी दुहेरी जबाबदारी पेलत माध्यमिक, उच्च माध्यमिक व अभियांत्रिकीची पदवी असा प्रवास त्याने पूर्ण केला. दहावीत चांगले गुण मिळूनही अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी पैसे नसल्याने शिक्षण अर्धवट सोडून सायकल दुरुस्तीच्या दुकानाकडे वळण्याचा विचार वरुणच्या मनात आला. मात्र, वडिलांवर उपचार करणा-या डॉक्टरांनी मदतीचा हात पुढे केला.
हीच मदत पुढील यशात मैलाचा दगड ठरली. अभियांत्रिकीच्या शिक्षणादरम्यान पुण्याच्या एमआयटी महाविद्यालयात पुन्हा या परिस्थितीचा सामना करावा लागला. परीक्षेत विद्यापीठात अव्वल ठरल्याने सर्व प्राध्यापकांनी पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंत सर्वतोपरी मदत केली. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत यशोशिखरे सर करणा-या वरुणने युपीएससी परीक्षेपर्यंतचा प्रवास उपस्थितांसमोर उलगडून दाखवला.
अभियांत्रिकेची पदवी घेतल्यानंतर वार्षिक चार-पाच लाख पगाराच्या नोक-यांची आॅफर वरुणला होती. त्याचदरम्यान हजारे यांच्या नेतृत्वाखाली जनलोकपालसाठी आंदोलन सुरू होते. चालून आलेली संधी व कुटुंबीयांचा विरोध डावलून युपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय त्याने घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत त्याने पहिल्याच प्रयत्नांत युपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. वरुणचे अनुभवकथन विद्यार्थ्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षांबाबतचा न्यूनगंड दूर करणारे ठरले. व्याख्यान ऐकण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सर्व प्रश्नांची त्याने उत्तरे दिली. लॉ कॉलेजशेजारी युवान अभ्यासिकेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्याने केले.
अण्णा हजारे यांच्याशी चर्चा
वरूण बरनवाल याने राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांनी भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देत सुमारे 40 मिनिटे चर्चा केली. प्रशासकीय सेवेत काम करताना देशातील भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे अण्णांनी त्याला सांगितले.