आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मुलाखत : राजकारण शुद्धीकरणासाठी लवकरच आंदोलन : अण्णा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राळेगणसिद्धी - देशातील भ्रष्टाचार आणि इतर अनेक प्रश्नांच्या मुळाशी पक्षीय राजकारण असून राज्यघटनेतील तरतुदीनुसार पक्ष, चिन्ह आणि समूहाने निवडणूक लढवता येणार नाही, या तत्त्वाची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच राजकीय पक्षांना मिळणाऱ्या सर्व देणगीदारांची नावे जाहीर करण्यात यावी यासाठी आता आंदोलन उभे करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. दै. "दिव्य मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या आगामी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेले ऐतिहासिक आंदोलन, त्यानंतर देशात झालेले सत्तांतर, आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये पडलेली फूट आणि देशातील सद्य:स्थिती अशा व्यापक विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. दरम्यान, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात २ एप्रिल किंवा त्यादरम्यान दिल्लीत आगामी आंदोलनासंबंधी एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता असून त्यानंतर आंदोलनाची घोषणा कधीही होऊ शकते, अशी चर्चा राळेगणसिद्धी येथे आलेल्या कार्यकर्त्यांत होती. अण्णा सध्या राळेगणसिद्धीला मुक्काम ठोकून असून त्यांना देशभरातून दररोज लोक भेटण्यासाठी येतात. त्यांना विशेष पोलिस संरक्षणही देण्यात आले आहे.

राजकीय पक्षांविषयीचा मुद्दा स्पष्ट करताना अण्णा म्हणाले, ‘भारतात खरी लोकशाहीच अजून आली नाही, हा खरा प्रश्न आहे. त्याच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येते की आपल्या संविधानात कोठेच पक्ष, चिन्ह, समूहाचे नाव नाही. अनुच्छेद ८४ (क) आणि (ख) मध्ये म्हटल्यानुसार किमान २५ वय असलेली कोणतीही व्यक्ती लोकसभेची आणि ३० वर्षांची व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते. पण पक्षीय समूहाला संविधान निवडणूक लढवण्यास परवानगी देत नाही. याचा अर्थ महात्मा गांधी यांनी म्हटल्यानुसार काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष त्याच वेळी बरखास्त व्हायला हवे होते; पण त्याकडे दुर्लक्ष करून १९५२ ची निवडणूक काँग्रेस व इतर पक्षांनी घटनाबाह्य लढविली व तोच प्रघात पडला. निवडणूक आयोगाने त्या वेळी मनाई न केल्याने हा अनर्थ झाला; पण आता आम्ही आयोगाला या तत्त्वाची आठवण करून देत आहोत. त्याविषयी पत्रव्यवहार सुरू आहे, तसेच पाच बैठकाही झाल्या आहेत. आयोगाने ही चूक दुरुस्त न केल्यास त्याच्या विरोधात आंदोलन करावे लागेल.’
राजकीय पक्षांचा कारभार १०० टक्के पारदर्शी असला पाहिजे, पक्षच लपूनछपून देणग्या घेत असतील तर राजकीय व्यवस्था शुद्ध कशी होणार, असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला. अण्णा म्हणाले, ‘पक्षांना कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळतात, पण २० हजारांपर्यंतच्या देणग्या कोणी दिल्या हे जाहीर करणे बंधनकारक नसल्याने कंपन्या, व्यापारी आणि धनाढ्यांनी दिलेल्या लाखो कोट्यवधींच्या देणग्यांचे २० हजारांचे तुकडे पाडून हा व्यवहार दडवून ठेवला जातो. ही तरतूद बदलण्याची गरज आहे.’
पक्षीय पद्धतीमुळे नेमके कोणते विपरीत परिणाम होतात, हे स्पष्ट करताना अण्णा म्हणाले, ‘सत्ता काबीज करण्यासाठीच पक्षांच्या मार्गाने काही लोक एकत्र येतात, मग ते गुंड आहेत, भ्रष्टाचारी आहेत, व्यभिचारी आहेत, हे बाजूला पडते आणि निव्वळ निवडून येण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. त्यामुळेच आजही संसदेच्या पवित्र मंदिरात १७० कलंकित लोक बसलेले आहेत. त्यामुळे आजची लोकशाही ही खरी लोकशाही आहे, असे म्हणता येत नाही. एक मे २०१५ नंतर होत असलेल्या निवडणुकांत मतपत्रिकेत किंवा यंत्रांत उमेदवारांचे फोटो छापण्यास आयोगाने सुरुवात केली आहे, पण पक्षांची चिन्हे अजून हटलेली नाहीत. ती चिन्हे हटवा, अशी आमची मागणी आहे.’
देशातील आणि दिल्लीतील सत्ताबदलाविषयी ते म्हणाले, ‘हा केवळ राजकीय बदल आहे. त्याने काही फरक पडत नाही. खरा बदल व्यवस्थेतील बदलामुळेच होतो. त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आंदोलन राजकीय बदलासाठी नाही, हे मी अरविंद केजरीवाल आणि इतरांनाही सांगितले होते, पण त्यांनी आंदोलनाचा गैरवापर केला आहे. असे नेते आता राजकीय तडजोडी करताना आणि चांगले बदल करण्यात अपयशी ठरतील, हे आपल्याला दिसेल. असा स्वार्थ साधणाऱ्यांना आंदोलनात स्थान नाही,’ माहिती अधिकाराचा कायदा, बदलीचा कायदा, ग्रामसभेला देण्यात आलेले अधिकार आणि जनलोकपाल हे असे व्यवस्थेतील बदल आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, त्यामुळे सत्तेवर अंकुश म्हणून जनतेचा दबाव गट आवश्यक असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘आपण त्यासाठी स्वच्छ चारित्र्याच्या कार्यकर्त्यांची फळी उभी करत आहोत, हा मोठा बदल असून त्याला कितीही काळ लागला तरी आम्ही मागे हटणार नाही. हा लढा रस्त्यावर येऊन करण्याची लगेच गरज नाही, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने तिच्याशी आम्ही चर्चा करत आहोत.’
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, १०००-५०० रुपयांच्या नोटांची गरज नाही
बातम्या आणखी आहेत...