आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडा प्रतिबंधक पथक गुन्हे शाखेअंतर्गत कार्यान्वित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दरोड्याच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी दरोडा प्रतिबंधक पथक पुन्हा कार्यान्वित केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेंतर्गत हे पथक कार्यरत असेल. नव्याने पुनर्रचना केलेल्या या पथकात एका पोलिस निरीक्षकासह सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अलीकडेच या पथकाने वेगवेगळ्या गुन्ह्यांतील तीन चोरांना गजाआड केले.
पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस कॉन्स्टेबल दीपक हराळ, बाबासाहेब गरड, भागिनाथ पंचमुख, संदीप पवार यांचा या पथकात समावेश आहे. हे पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असेल.
दोन दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा परिसरात दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा रचून दोघाजणांना पाठलाग करून पकडले. राहुल गुलाब केदारी व दीपक ऊर्फ नाना पोपट केदारी अशी आरोपींची नावे आहेत. अधिक चौकशीअंती या दोघांनी सुपे पोलिस ठाण्याच्या हद्दीत कॉपर चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पथकाने त्यांच्या ताब्यातून २० किलो कॉपर हस्तगत करून त्यांना सुपे पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी याच गुन्ह्यातील तिसरा आरोपी रमेश सावत्या भोसले (रा. चास) यालाही गजाआड केले.

दरोडा प्रतिबंधक पथकाची पुनर्रचना करुन त्यामध्ये अनुभवी अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यांचा तपासाला वेग प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.