आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anti Toll Agitation: MNS Members Secreatly Handle Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोलविरोधी आंदोलन: मनसे कार्यकर्त्यांचा पोलिसांना चकवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी बुधवारी नगरमध्ये गनिमी कावा वापरून आंदोलन केले. शहरात येणार्‍या प्रमुख महामार्गांवर कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी ताबडतोब कार्यकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पण या आंदोलनाचा फटका शहर बसला बसला. आयुर्वेद रस्त्यावर अज्ञात युवकांनी एका एएमटी बसच्या काचा फोडल्या.


आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी पोलिसांनी मनसे पदाधिकार्‍यांना नोटिसा बजावल्या होत्या. खबरदारी म्हणून बुधवारी सकाळी नगरसेवक गणेश भोसले, कैलास गिरवले, नितीन भुतारे, गणेश नन्नावरे, दत्ता खैरे, अजय अजबे यांना कोतवाली पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. तोफखाना पोलिसांनी जिल्हा संघटक सचिन डफळ, शहराध्यक्ष सतीश मैड, संजय झिंजे यांना सकाळीच ताब्यात घेतले. इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मात्र पोलिसांना चकवा देत ठिकठिकाणी रास्ता रोको केला.


ज्येष्ठ नेते वसंत लोढा, नगरसेवक किशोर डागवाले, गिरीश जाधव, मनोज राऊत, पोपट पाथरे, गणेश शिंदे व काही कार्यकर्ते पोलिसांना चकवा देत सकाळी साडेदहा वाजता प्रेमदान चौकात रास्ता रोको केला. ही माहिती मिळताच तोफखान्याचे पोलिस निरीक्षक विजयसिंह पवार व सहकारी घटनास्थळी आले. आंदोलकांना ताब्यात घेताना कार्यकर्ते व पोलिसांत शाब्दिक चकमक उडाली. मनसेचे नगर तालुकाध्यक्ष दीपक कार्ले यांच्यासह विनोद कांबळे, रोहन डागवाले आदी कार्यकर्त्यांनी पुणे रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलावर रास्ता रोको केला.


आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात होता. कोठला परिसरात शहर विभागाचे उपअधीक्षक श्याम घुगे तळ ठोकून होते. प्रमुख चौकांमध्येही बंदोबस्त होता. तरीही कार्यकर्त्यांनी पोलिसांना चकवा दिला. धरपकड सुरू झाल्यावर काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लपण्याकरिता चक्क अमरधामचा आधार घेतला.


महामार्गावर टायर जाळला
मनसे महिला आघाडीच्या अँड. अनिता दिघे, गजेंद्र राशिनकर, रमेश सानप, मयूर मैड, अभिषेक मोरे, सुशील घंगाळे आदी कार्यकर्ते पोलिसांना चकवा देत औरंगाबाद रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेलजवळ रास्ता रोको केला. तेथे रस्त्यावरच टायर पेटवून दिले. वाहन न थांबवणार्‍या चालकांना दमदाटी केली गेली. पोलिस तेथे येईपर्यंत कार्यकर्त्यांनी पोबारा केला. त्यानंतर मनमाड रस्त्यावर हुंडेकरी शोरुमसमोर याच कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.

‘एमएटी’ पुन्हा टार्गेट
शहर बससेवा नेहमीच दहशतीखाली आहे. पंधरवड्यापूर्वी अँपेरिक्षाचालकांचा संप सुरू असताना दोन शहर बस ‘टार्गेट’ झाल्या होत्या. बुधवारी सकाळी पुन्हा एकदा आयुर्वेद रस्त्यावर शहर बसला ‘टार्गेट’ करण्यात आले. माळीवाड्यातून निर्मलनगरच्या दिशेने निघालेल्या (एमएच 19 वाय 5390) या बसची समोरची काच फोडण्यात आली. चेहरे बांधून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी हे कृत्य केल्याचे चालक साबिर शेख यांनी सांगितले.

बंदोबस्तात टोलवसुली
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील सातही टोलनाक्यांवर बंदोबस्त तैनात केला होता. प्रत्येक टोलनाक्यावर निरीक्षक किंवा सहायक निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी, सात पोलिस कर्मचारी व राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आली होती. याशिवाय ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत टोलनाके आहेत, त्या पोलिस ठाण्याचे एक फिरते गस्तीपथक अनुचित प्रकारांवर लक्ष ठेवून होते. दिवसभर कडक बंदोबस्तात टोलवसुली झाली.

भिंगार वेशीत रास्ता रोको
मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भिंगार वेशीजवळ नगर-पाथर्डी रस्त्यावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ गांगर्डे यांच्या पथकाने आंदोलकांना ताबडतोब ताब्यात घेतले. यात भिंगार शहराध्यक्ष अरुण वाघ, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अलका पांढरे, रवी फल्ले, उस्मान सय्यद, गणेश साठे, राम बिडवे, गणेश वाघस्कर, अमोल वाघस्कर यांचा समावेश होता. अन्य पदाधिकार्‍यांना सकाळीच ताब्यात घेण्यात आले होते.