आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anty Corruption Issue In Ahmednagar Police And ST Office Arrested

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विसर कर्तव्याचा: अहमदनगरात लाचखोर पोलिस, एसटी अधिकार्‍यांना कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडूनच लाच उकळण्याचा प्रयत्न पोलिस व एसटी अधिकार्‍याच्या चांगलाच अंगलट आला. याप्रकरणी जेरबंद करण्यात आलेल्या पाचपैकी चौघांना विशेष जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांनी शुक्रवारी पोलिस कोठडी सुनावली. एकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

शहर वाहतूक शाखेत नेमणुकीला असलेले पोलिस उपनिरीक्षक सय्यद जमादार महंम्मद (वय 58), हेड कॉन्स्टेबल अशोक बबनराव जाधव (वय 51), कॉन्स्टेबल सनी विजय वाघेला (वय 25), एसटी महामंडळाचे सहायक वाहतूक निरीक्षक जगदीश जयराम क्षेत्रे (वय 46) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एसटी चालक गोकुळ नामदेव सोनवणे (वय 44) याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

अवैध वाहतुकीला आळा घालण्याची जबाबदारी असणारे पोलिस व एसटीचे अधिकारी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांकडून ‘वसुली’ करत असल्याचे गुरुवारी (29 ऑगस्ट) स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक देवरे हे त्यांच्या पथकासह शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे गेले होते. सायंकाळी नगरकडे परत येत असताना बोधेगाव-शेवगाव रस्त्यावरील बाभुळगाव फाटा येथे ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव असलेल्या टाटा सुमोमध्ये बसलेल्या एकाने त्यांची क्रूझर गाडी थांबवण्याचा इशारा केला. देवरे यांना शंका आल्याने त्यांनी क्रूझरचा चालक नासीर शेख याला त्यांच्याकडे पाठवले. एसटी व पोलिसांचे भरारी पथक या गाडीत होते. अवैध प्रवासी वाहतुकीबाबत केस करण्याची धमकी देऊन भरारी पथकाने शेख याच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. क्रूझर गाडीची कागदपत्रे व परवाना सोबत असल्याचे शेख याने सांगितले. गाडीत क्षमतेइतकेच प्रवासी असल्याचेही निदर्शनास आणून दिले. तथापि, केस टाळण्यासाठी किमान पाचशे रुपये द्यावेच लागतील, असा पवित्रा भरारी पथकाने घेतला.

शेख याने परत येऊन देवरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर लाचलुचपतच्या पथकाने लाचेची मागणी होते किंवा नाही याची पडताळणी सरकारी पंचामार्फत केली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलुचपतच्या पथकाने पाचशे रुपयांची नोट शेखकडे देऊन सरकारी पंचासह परत पाठवले. भरारी पथकाने लाच स्वीकारताच शेख याने ठरल्याप्रमाणे इशारा केला. लाचलुचपतच्या पथकाने तातडीने धाव घेत सुमोमध्ये बसलेल्या पाचही जणांना जेरबंद केले. त्यांच्याविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन शुक्रवारी विशेष जिल्हा न्यायाधीश ख्वाजा यांच्यासमोर हजर करण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने अँड. सुरेश लगड व देवरे यांनी युक्तिवाद करत आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपींच्या घरांची झडती घेण्यात आली असून आरोपी व नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता खरेदी झाल्याची शक्यता सरकार पक्षाकडून व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी कोठडीची मागणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने चौघांना एक दिवसाची पोलिस कोठडी, तर एकाला न्यायालयीन कोठडी दिली.

आयती शिकार
लाचखोरीच्या तक्रारीनुसार कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधकचे पथक बोधेगावला गेले होते. मात्र, सापळा अयशस्वी झाल्याने निराश होऊन पथक परत निघाले. मात्र, भरारी पथकाने त्यांची गाडी थांबवून हात दाखवून अवलक्षण पदरी घेतले. आयती आलेली शिकार न सोडण्याचा चंग बांधून पथकाने तातडीने हालचाली केल्या. एकाच वेळी पाचजणांना लाच घेताना पकडण्याची संधी पथकाने साधली.

0आरोपींच्या घराची घेतली झडती
0 आरोपी व नातेवाईकांच्या मालमत्तेचा शोध सुरु
0 यापूर्वीही भरारी पथकाकडून वसुलीची शक्यता
0 कर्तव्य विसरुन आरोपींकडून भ्रष्ट मार्ग
0 आरटीओ नव्हे, तर आरोपी पोलिस व एसटीचे!
0 अशा प्रवृत्तीमुळे फोफावते अवैध वाहतूक
0 घटनेमुळे जिल्ह्यात उडाली खळबळ
0 पहिल्यांदाच पाच जण अडकले सापळ्यात