आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन निर्णयाला केराची टोपली;अनुकंपा यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे टाळले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अनुकंपावरील नियुक्तीची प्रतीक्षा यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी दिले आहेत. तथापि, जिल्हा परिषदेने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
कामावर असताना एखादा कर्मचारी मरण पावल्यास त्याची पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी एकाला किंवा कोणी नसल्यास सुनेला अनुकंपा तत्त्वाखाली शासकीय सेवेत घेतले जाते. सन 2005 पूर्वी रिक्त जागांवर प्राप्त प्रस्तावानुसार अनुकंपाखाली भरती केली जात होती. नंतर या निर्णयात बदल करून दरवर्षी रिक्त होणार्‍या पदांपैकी अवघी 5 टक्के पदे भरण्याचे निर्देश शासनाने दिले. वास्तविक ही अट जाचक आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रतीक्षा यादी मोठी होत आहे. त्या तुलनेत कर्मचारी भरती होत नाही. दरम्यान, सहावा वेतन आयोग लागू केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी क आणि ड संवर्गातील कर्मचारी भरतीवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यानंतर निर्बंध काही अंशी शिथिलही करण्यात आले. परंतु अनुकंपा तत्त्वावरील भरतीवरील बंदी कायम होती.
सरकारने 31 डिसेंबर 2011 रोजी अनुकंपावरील गट क आणि ड वर्गाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला मान्यता दिली. या निर्णयाचे कर्मचारी संघटनांकडून स्वागत झाले. अनुकंपाची निवड पारदर्शीपणे होऊन यामध्ये गतिमानता यावी यासाठी 17 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची प्रतीक्षा यादी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने या आदेशाला केराची टोपली दाखवत प्रतीक्षा यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली नाही. आपले स्थान यादीत कोणत्या क्रमांकावर आहे, याबाबत माहिती मिळत नसल्याने संबंधितांवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे.