आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुनाद फाउंडेशनची तीन वर्षांची सुरेल सांस्कृतिक वाटचाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरच्या सांस्कृतिक विश्वात विविध रंग भरणा-या अनुनाद फाउंडेशनने तीन वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. नवीन पर्वातील सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला असून या पर्वासाठी रसिकांनी मोठा प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तन्मय देवचके, कल्पेश अदवंत, शिल्पकार प्रमोद कांबळे व अ‍ॅड. किशोर देशपांडे यांनी केले आहे.
जानेवारी 2011 मध्ये अनुनाद फाउंडेशनची स्थापना झाली. संगीताचे शिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेलेले हार्मोनियम वादक तन्मय देवचके आणि तबला वादक कल्पेश अदवंत यांनी नगर शहरातील सांस्कृतिक विश्वासाठी काहीतरी करावे, अशा निर्धार करून त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली. "गुज अंतरीचे' या संगीत, नृत्य व नाट्य या तिन्ही कलाप्रकारांचा आविष्कार असलेल्या अत्यंत दर्जेदार कार्यक्रमाने पहिल्या पर्वाचा श्रीगणेशा झाला. प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी, नृत्यांगणा शर्वरी जमेनिस, गायिका योगिता गोडबोले, अनिरूद्ध जोशी, सायली जोशी या कलावंतांमुळे हा पहिलाच कार्यक्रम संस्मरणीय झाला. पंडित भीमसेन जोशी यांचे पट्टशिष्य पंडित आनंद भाटे व पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या शिष्या देवकी पंडित यांनी ख्याल, ठुमरी, नाट्यगीते व अभंग सादर करत त्यांना खिळवून ठेवले. त्यानंतर सादर झालेल्या नृत्यसंगम कार्यक्रमात कथ्थक या उत्तर भारतीय नृत्यशैलीचा, तर भरतनाट्यम या दक्षिण भारतीय नृत्यशैलीचा सुंदर मिलाफ रसिकांनी अनुभवला. नृत्यांगणा शांभवी वझे व नर्तक परिमल फडके यांनी हा कार्यक्रम सादर केला. "गाता रहे मेरा दिल' हा अभिनेते देव आनंद यांच्या स्मरणार्थ केलेला कार्यक्रम, आघाडीचे बासरीवादक पंिडत राकेश चौरसिया व पंडित विजय घाटे यांचे तबलावादन अविस्मरणीय ठरले.

दुसऱ्या पर्वाची सुरूवात "ब्लॅक अँड व्हाईट' या जुन्या हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने झाली. त्यानंतर सादर झालेला "सोबतीचा करार' हा गझलांचा, तर गुरू-शिष्य परंपरेचे दर्शन घडवणारा परंपरा कार्यक्रम आगळावेगळा ठरला. प्रसिद्ध तबलावादक पंडित सुरेश तळवलकर व त्यांची शिष्या सावनी तळवलकर यांची ताल प्रस्तुती व ज्येष्ठ नृत्यांगणा डॉ. सुचेता-चापेकर व त्यांची शिष्या प्रचिती देवचके यांचे नृत्य नगरच्या रसिकांना भावले. इंद्रधनु कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावे, प्रथमेश लघाटे व सारेगामाचा वाद्यवृंद नगरकरांच्या भेटीला आला. संगीत दरबार या कार्यक्रमाने पर्वाची सांगता झाली. आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद पुढच्या पर्वातही रसिकांकडून मिळेल, अशी खात्री तन्मय व कल्पेश यांनी व्यक्त केली. सभासद होण्यासाठी ९४२३७९३३८४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.