आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपयुक्त पाणीसाठा पाच टक्क्यांवरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गेल्या पंधरा दिवसांपासून नुसतेच ढग जमा होऊन पावसाचे वातावरण निर्माण होते. मात्र, पाऊस पडत नाही. छाया: कल्पक हतवळणे. )
नगर- पाणलोट क्षेत्रात पाऊस थंडावल्याने मुळा धरणातील नवीन पाण्याची अावक मंदावली आहे. परिणामी जुलैचा पहिला आठवडा उलटत आला, तरी धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघ्या पाच टक्क्यांवरच रेंगाळला आहे. कोतूळ परिसरातून केवळ २१२ क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने धरणात फारच थोडे पाणी येत आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नगर शहराची तहान भागवणाऱ्या मुळा धरणात सध्या मृतसाठ्यासह २१ टक्के पाणीसाठा आहे. मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे सुरुवातीला पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रातही आनंदाचे वातावरण होते. मात्र, गेल्या तीन आठवड्यांपासून लाभक्षेत्रातील पाऊस थांबला, तर पाणलोट क्षेत्रातही गेल्या दाेन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरवली आहे.

२३ २४ जूनदरम्यान पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने मुळा नदीचे पात्र कोतूळ परिसरात ८५०० क्युसेक्स वेगाने वाहते झाले होते. या दमदार पावसाने मुळा धरणात जवळपास एक टीएमसी (१००० दशलक्ष घनफूट) नवीन पाण्याची भर घातली. उपयुक्त पाणीसाठा दोन टक्क्यांच्याही खाली पोहोचलेला असताना मध्यंतरी झालेल्या पावसाने दिलासा दिला होता. त्यानंतर पाणलोट क्षेत्रातही किरकोळ स्वरूपाचा पाऊस सुरू असून सध्या कोतूळ परिसरात मुळा नदीपात्रातून केवळ २१२ क्युसेक्स वेगाने पाणी वहात आहे.

गेल्या वर्षी याच दिवसांत धरणात ५००० दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. मृतसाठा वगळता अडीच टक्के उपयुक्त पाणी धरणात होते. गेल्यावर्षी जूनअखेरीस पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली होती. पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्या वर्षी धरणातील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला होता. गेल्या वर्षी २३ सप्टेंबरला धरणात सर्वाधिक २५.१३ टीएमसी पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ दिवस अगोदरच पाण्याची अावक सुरू झाली होती. मात्र, पावसात खंड पडल्याने धरणातील आवक मंदावली आहे.

मुळा धरणाच्या उजव्या डाव्या कालव्यावर जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ३० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा पुरवण्यात येते. धरणाच्या सुधारित मान्यतेच्या प्रस्तावानुसार १९ टीएमसी पाण्यातून जवळपास ८३ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्षात तरतुदीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळताे. पावसाने दडी मारल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या नजरा पाणलोट क्षेत्रातील पावसाकडे लागल्या आहेत.
धरणाची सद्यस्थिती दलघफूमध्ये
एकूणसाठा : ५५८७
मृतसाठा : ४५००
उपयुक्त पाणी : १०८७
पाणलोटातील पाऊस : १२२ मिलिमीटर
१२२ मिलिमीटर पाऊस
सुरुवातीलापाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसात आंबित धरण भरले. त्यानंतर २३ जूनपासून झालेल्या पावसाने अर्धवट असलेले पिंपळगाव खांड धरण भरून पाणी मुळा धरणाकडे झेपावले. जोरदार पावसामुळे मुळा धरणात जवळपास एक टीएमसी पाणी जमा झाले. मात्र, त्यानंतर खंड पडल्याने आवक थंडावली. धरणाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या अकोेले तालुक्यातील कोतूळ परिसरात आतापर्यंत १२२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.