आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरणगाव ग्रामस्थांनी पाळला कडकडीत बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तालुक्यातील अरणगाव येथील हनुमान व खंडोबा मंदिरात अंधश्रद्धेतून झालेल्या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत गाव बंद ठेवले. धार्मकि भावना दुखावल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सोमवारी सकाळी हनुमान मंदिराचे पुजारी संजय पवार आणि खंडोबा मंदिराचे पुजारी भाऊसाहेब गहिले हे साफसफाई आणि पुजेसाठी मंदिरात आले. मंदिराच्या गाभाऱ्यात रक्त शिंपडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दोन्ही पुजाऱ्यांनी सरपंच सुजित कोके यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ही बातमी गावभर पसरली.

या घटनेचा निषेध करत समाजकंटकाचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. रास्ता रोको आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती समजताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विश्वास निंबाळकर अरणगावात दाखल झाले. त्यांनी मंदिरांची पाहणी करत रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले.
शविसेनेचे तालुकाप्रमुख संदेश कार्ले, सरपंच कोके, गणेश आजबे, पोपट पुंड, आनंदा शेळके, सुभाष पुंड, बापू दळवी, मारुती विटेकर, अशोक पुंड, संतोष दळवी आदींनी घटनेचा निषेध करत शांतता राखण्याचे आवाहन केले. पोलिसांनी आठ दिवसांत आरोपीचा शोध घेतला नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. सहायक निरीक्षक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.
गावाला छावणीचे स्वरूप
अरणगाव येथील मंदिरात घडलेल्या प्रकाराबाबत अरणगावच्या ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला. गावातील सर्व व्यावसायिकांनी दिवसभर आपापले व्यवसाय बंद ठेवून बंद पाळला. पोलिसांनी आठ दिवसांत आरोपीचा शोध घेतला नाही, तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. गावातील तणावाचे वातावरण पाहता राज्य राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) एक तुकडी दिवसभर गावात तैनात करण्यात आली होती. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते.