आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करे टोळीतील गुंड गाडे, खरचंदसह चौघे जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर -  नेवासे येथील कुख्यात लष्करे टोळीचा म्होरक्या सोपान भगवान गाडे शार्पशुटर प्रवीण पोपट खरचंद यांच्या मुसक्या आवळण्यात नगर पोलिसांना यश आले आहे. सहायक पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने थेट तेलंगाणा राज्यात जाऊन ही कामगिरी केली. त्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून पोलिसंाचे पथक कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा राज्यात शोधमोहीम राबवत होते. अखेर शुक्रवारी सायंकाळी या मोहिमेला यश आले. 
 
सोपान भगवान गाढे याला अॅड. असिफ पटेल खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याशिवाय अॅड. रियाज पठाण यांच्या खून खटल्यातही तो आरोपी होता. हा खटला न्यायप्रविष्ट असून याच खटल्याच्या कामकाजासाठी येरवडा कारागृहातून आणले असता २१ जुलै २०१५ ला पुणे पोलिसांच्या ताब्यातून तो पसार झाला होता. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद होती. त्याच्यावर यापूर्वी दंगल, मारहाण, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही गुन्हे दाखल आहेत. 

अॅड. पठाण यांच्यावर गोळीबार करणारा शार्पशुटर प्रवीण पोपट खरचंद आजारी असल्यामुळे त्याला एप्रिलला उपचारांकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथून एप्रिलच्या पहाटे तो लघुशंकेचा बहाणा करून पळाला. प्रवीणला पळून जाण्यासाठी प्रफुल्ल ऊर्फ सोनू अण्णासाहेब पराड (रा. नवनागापूर) याने मदत केली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. हे आरोपी पळून गेल्यामुळे त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाचा मोठा गुन्हा होण्याची शक्यता होती. 
 
दै. दिव्य मराठीने याबाबत ‘आरोपींच्या पलायनामुळे पाेलिसांची अब्रू चव्हाट्यावर’ असे लक्षवेधी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक आरोपींच्या शोधासाठी तैनात केले. या पथकात सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, शरद गोर्डे, पोलिस हेड काॅन्स्टेबल योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोलिस नाईक दत्तात्रय हिंगडे, राहुल हुसळे, रविकिरण सोनटक्के, योगेश सातपुते, चालक बाळासाहेब भाेपळे, सचिन कोळेकर यांचा समावेश होता. पोलिसांना सोपान गाडे हा हैदराबाद परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथक त्या दिशेने रवाना झाले. पथकाने तेलंगाणा, हैदराबाद (आंध्र प्रदेश), बिदर, मुधोल (कर्नाटक) आदी ठिकाणी जाऊन संभाव्य निवासाच्या ठिकाणी आरोपींचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाही. ११ एप्रिलला हैदराबाद येथे निघणाऱ्या मिरवणुकीत आरोपी येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून सापळा रचला, अन् त्यांना यश आले. 

तुरुंगात झाली मैत्री 
अॅड.पठाण खून खटल्यात अटकेनंतर प्रवीण खरचंद सबजेलमध्ये बरेच दिवस होता. तेथेच त्याची प्रफुल्ल ऊर्फ सोनू पराड (नवनागापूर) याच्याशी ओळख झाली. सोनूही एका खून प्रकरणात जेलमध्ये होता. ही ओळख पुढे घट्ट मैत्रीमध्ये रुपांतरित झाली. पुढे सोनू खून खटल्यातून निर्दोष मुक्त झाला. बाहेर आल्यानंतरही तो प्रवीणच्या संपर्कात होता. दोघांनी मिळूनच जिल्हा रुग्णालयातून पळून जाण्याचा कट रचला. सोनूनेच प्रवीणला जिल्हा रुग्णालयातून पळून जाण्यासाठी मदत केली होती. 

तीन गुन्ह्यांची उकल 
सोपानगाडे खरचंद यांना पकडायला गेलेल्या पोलिसांना एकूण तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. सोपान गाडे खरचंद, तर त्यांना गवसलेच. त्यांच्या पलायनाप्रकरणी कोतवाली तोफखान्यात स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद होती. याशिवाय तेथे पोलिसांना एक नवविवाहित जोडपेही मिळाले. तरुणाचे नाव अतुल ज्ञानेश्वर कडू (रा. नेवासे) हा एका अल्पवयीन मुलीसह तेथे मिळून आला. याप्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद आहे. 

गाडे रमला व्यवसायात 
फरारझालेला सोपान गाडे हा शंकरपेल्ली (जि. रंगारेड्डी, तेलंगाणा) येथे मार्बलचा (फरशी बसवण्याचा) व्यवसाय करत हाेता. नगर पोलिसांनी स्थानिक पोलिसंाच्या मदतीने सापळा रचून त्याला सिनेस्टाईल पद्धतीने पकडले. कसून चौकशी केली असता त्याने प्रवीण खरचंद हा दुसरा साथीदार प्रफुल्ल ऊर्फ सोनू अण्णासाहेब पराड याच्यासह साई कॉलनीतील घरात भाड्याने रहात असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण सोनूलाही सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. 

पोलिसांचे अथक प्रयत्न 
गाडेखरचंद यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तैनात झाले. या पथकाने सुतावरून स्वर्ग गाठत आठ दिवसांत तीन राज्ये पालथी घातली. आरोपींचा ठावठिकाणा समजला, तेव्हापासून पथक जागे होते. आरोपींनी पलायनाचा प्रयत्नही केला. मात्र, जीव धोक्यात घालून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना नगरला आणण्याचा सलग बारा तासांचा परतीचा प्रवासही धोकादायक होता. पण, जिगरबाज पोलिसांनी कामगिरी फत्ते केली. 
 
बातम्या आणखी आहेत...