आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army News In Marathi, Lok Sabha Election, Nagar, Divya Marathi

सीमेवरील 12 हजार सैनिक करणार मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हाधिकारी अनिल कवडे - Divya Marathi
जिल्हाधिकारी अनिल कवडे
नगर - सीमेवर असलेल्या जिल्ह्यातील सैनिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी त्यांना मतपत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. 12 हजार सैनिक मतदानाचा हक्क पोस्टाने बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बुधवारी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी कवडे बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, निवडणूक खर्च नियंत्रक विजय कोते यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कवडे म्हणाले, मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. मतदानाची वेळ 11 तासांची करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर संबंधित उमेदवारांनी प्रतिनिधींची नियुक्ती करावी. प्रतिनिधी त्या भागातील मतदार असला पाहिजे. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होईल. त्याअगोदर मतदान केंद्रावर प्रतिनिधी उपस्थित असणे गरजेचे आहे. 11 एप्रिलला प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कर्मचारी व अधिकार्‍यांना मतदान यंत्राबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 63 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत, असे त्यांनी सांगितले.
शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक कार्यक्रमपत्रिका तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे त्यांना मतदान करता येईल. मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांना छोटे मंडप उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. मतपत्रिकेवर ब्रेललिपीही आहे, असे कवडे म्हणाले.
वाहनांवर स्पिकर नको
आचारसंहितेबाबत सर्व उमेदवारांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. अनेक भागात प्रचाराच्या वाहनांवर स्पिकर लावण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वाहनांवर कारवाई करून ती जप्त करण्यात येतील. उमेदवारांच्या खर्चातही अनेक त्रुटी असून संबंधितांना नोटिसा पाठवण्यात येणार आहेत.’’ अनिल कवडे, जिल्हाधिकारी.
.. तर गुन्हा दाखल करू
प्रचारासाठी राजळेंनी बनावट मतपत्रिका तयार केल्याचा मुद्दा शिवाजी डमाळे यांनी उपस्थित केला. या मतपत्रिकेवर मोठय़ा आकारात घड्याळाचे चिन्ह दाखवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. संबंधितांवर गुन्हा दाखल करू, असे कवडे म्हणाले. त्यावर मीच फिर्याद दाखल करणार असल्याचे डमाळेंनी सांगितले.