श्रीगोंदे- नगर जिल्ह्यातील घोड धरणातून पाणी साेडण्यात यावे, या मागणीसाठी कालव्याच्या मुख्य प्रवेश द्वारावर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी वादावादी झाली. माजी मंत्री व भाजपचे नेते बबनराव पाचपुतेंनी कालव्याचे मुख्य गेट बळजबरीने उघडल्या प्रकरणी त्यांना बेलवंडी (ता. श्रीगोंदे) पोलिसांनी दुपारी अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. पाचपुतेंसह अन्य पाच कार्यकर्त्यांवर या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.
घोड धरणात सध्या दीड टीएमसीपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा असल्याने शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी माजी मंत्री बबनराव पाचपुतेंची मागणी होती. बुधवारी त्यांनी घोडच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून बुधवारी दुपारी घोडच्या कालव्यातून पाणी सोडले होते. पाचपुतेंसोबतचे कार्यकर्ते कालव्यावरून गेल्यानंतर पुन्हा ते बंद करण्यात आले. घोडचे पाणी बंद केल्याचे समजताच संतप्त झालेले पाचपुते गुरुवारी पुन्हा घोड धरणावर पोहोचले. तेथील मुख्य कालव्याच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांनी ठाण मांडले. नंतर गेटची चावी घेऊन पाणी सोडले.