आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाविश्व : अभिजित दळवीला 'झी नाट्य गौरव'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहरातील अभिजित दळवी याला सर्वाेत्कृष्ट नाट्यलेखनासाठी झी नाट्य गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. झी नाट्य गौरव पुरस्काराचे हे सोळावे वर्ष होते. मुंबईतील भाईदास थिएटरमध्ये नुकताच हा दिमाखदार सोहळा पार पडला. 'भेटी लागी जीवा' या प्रायोगिक नाटकाच्या लेखनासाठी अभिजितला हा पुरस्कार देण्यात आला.

अभिजित गेल्या नऊ वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहे. अभिनय, लेखन, प्रकाश योजना या विभागात अभिजित काम करत आहे. एकपात्री अभिनेता ते दिग्दर्शन पुढे लेखन असा प्रवास त्याने केला आहे. अॅन इंटरव्ह्यू, जाहला सोहळा अनुपम, मार्क्स अॅड फ्राइड, रात्र लग्नाची, मिशन सोल्जर, वाचलेली एकलेली, चीनची भिंत अशा एकांकिकांचे लेखन अभिजितने केले आहे. राज्यातील विविध आंतरमहाविद्यालयीन खुल्या स्पर्धा या एकांकिकांनी गाजवलेल्या आहेत. आज काल हे असंच असतं, इमोट आयकॉन्स या दीर्घांकाचे लेखनही अभिजितने केलेले आहे.

भेटी लागी जीवा हे झी नाट्य गौरव विजेते प्रायोगिक नाटक मानवी संवेदना, वृत्ती जीवनाचा सखोल आढावा घेणारे नाटक आहे. पंढरपूरची वारी या माध्यमातून या नाट्याची मांडणी करण्यात आली आहे. वकिली व्यवसाय करत असतानाही अभिजितने नाटक कधी सुटू दिले नाही. रंगभूमीशी घट्ट नाळ जोडली गेल्याने पुणे असो की, मुंबई हे क्षेत्रापासून तो कधीही दूर झाला नाही.

या प्रवासात त्याने मिलिंद शिंदे, बलभीम पठारे, सतीश लोटके यांच्याकडे नाट्याचे धडे घेतले. अमित बैचेंसारखा मोठा लेखकमित्र सदैव त्याच्या पाठीशी उभा राहिला. प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे यांना गुरू मानणा-या अभिजितने श्रीमंत दामोदर पंत, खो-खो या चित्रपटांमध्ये, तर झी वाहिनीवरील मधू इथे चंद्र तिथे या सिरीयलमध्येही काम केले.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या आगामी चित्रपटातही त्याची महत्त्वाची भूमिका आहे. या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत नगरला अनेक पुरस्कार मिळवून देण्याचा अभिजितचा मानस आहे. या यशाबद्दल नगरच्या ज्येष्ठ कलावंतांनी त्याचे अभिनंदन केले.

झी गौरव पुरस्कार स्वीकारताना नगरचा रंगकर्मी अभिजीत दळवी.

आई-वडिलांकडून लेखनाची प्रेरणा
झीनाट्य गौरव पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर आपल्याला लेखनासाठी आई अलका वडील अरविंद यांच्याकडून प्रेरणा मिळाली असल्याचे अभिजित दळवी याने सांगितले. पहिला झी नाट्य गौरव पुरस्कार नगरच्या मातीतल्या प्रत्येक कलावंताच्या कार्याला समर्पित केल्याचेही त्याने स्पष्ट केले.